उत्कर्ष अॅग्रो कंपनीच्या कार्यालयाला टाळे
By Admin | Updated: October 18, 2015 00:54 IST2015-10-18T00:54:09+5:302015-10-18T00:54:09+5:30
उत्कर्ष अॅग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह कंपनीचे जिल्हा क्रीडा संकुलातील कार्यालय बंद आढळून आले आहे.

उत्कर्ष अॅग्रो कंपनीच्या कार्यालयाला टाळे
जळगाव : जळगाव येथील उत्कर्ष अॅग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह कंपनीचे जिल्हा क्रीडा संकुलातील कार्यालय बंद आढळून आले आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणी चौकशी करीत त्या आशयाचा अहवाल सहकार आयुक्तांना पाठविला आहे. येथील उत्कर्ष अॅग्रो कंपनीसह महाराष्ट्रातील तीन कंपन्यांनी गुंतवणुकीचे आमिष दाखवून मोठा घोटाळा केल्याच्या तक्रारी कृषि मंत्रालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने जळगाव येथील उत्कर्ष अॅग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह कंपनीच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या कंपनीबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर सहकार आयुक्तांनी जळगावचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांना चौकशीचे आदेश दिले होते. राऊत यांच्यासह साहाय्यक रजिस्टार एस.आर.शहा, डी.व्ही. पाटील, बी.एस.देशपांडे यांनी 7 ऑक्टोबर रोजी उत्कर्ष अॅग्रो कंपनीच्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील मुख्य कार्यालयास भेट दिली. मात्र हे कार्यालय बंद आढळून आले. त्यानंतर या अधिका:यांनी पुन्हा 8 ऑक्टोबर रोजी या कार्यालयाची तपासणी केली. मात्र त्या दिवशीदेखील बंद आढळून आले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने त्या आशयाचा पंचनामा केला. तसेच उत्कर्ष अॅग्रो कंपनीच्या सद्यस्थितीचा अहवाल संजय राऊत यांनी सहकार आयुक्तांना पाठविला आहे. मल्टीस्टेटची परवानगी उत्कर्ष अॅग्रो या कंपनीला मल्टीस्टेटचा दर्जा देण्यात आला आहे. ज्या कंपनीचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रासह अन्य राज्यात असते. त्या कंपनीला मल्टीस्टेटचा दर्जा दिला जात असतो. अशा स्वरुपाच्या कंपन्यांची दिल्ली येथील कार्यालयात नोंदणी होत असल्याचे उत्कर्ष अॅग्रो कंपनीचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे रेकॉर्ड नसल्याचे राऊत यांनी सांगितले.