अमेरिकेचा दुष्काळ भारतीय कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर, पांढऱ्या सोन्याला झळाळी

By Ajay.patil | Published: August 31, 2022 04:41 PM2022-08-31T16:41:55+5:302022-08-31T16:42:37+5:30

पांढऱ्या सोन्याला यंदा मिळणार आणखीनच झळाळी : अमेरिकेची निर्यात कमी होणार, भारताची वाढण्याची शक्यता

US drought on the path of Indian cotton growers, white gold get high rate in market | अमेरिकेचा दुष्काळ भारतीय कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर, पांढऱ्या सोन्याला झळाळी

अमेरिकेचा दुष्काळ भारतीय कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर, पांढऱ्या सोन्याला झळाळी

googlenewsNext

अजय पाटील

जळगाव - गेल्या वर्षाप्रमाणेच यंदा देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला दमदार भाव मिळणार असून, अमेरिकेतील मुख्य लागवड होणाऱ्या टेक्सास, कॅलीफोर्नीया या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती असल्याने अमेरिकेतील कापसाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के  घट होण्याचा अंदाज कॉटन मार्केटमधील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमेरिकेकडून होणारी निर्यात कमी होवून, भारताला ही संधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने भारतीय बाजारात कापसाची मागणी वाढणार आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दमदार भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचे जवळपास ३५ ते ४० टक्के नुकसान झाले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातंर्गत मागणी वाढल्यामुळे कापसाला रेकॉर्डब्रेक भाव मिळाला. त्यामुळे अतीवृष्टीमुळे नुकसान होवूनही, शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. यंदा देखील चांगला भाव मिळेल या अपेक्षेने भारतात देखील कापसाचा पेरा वाढला आहे. त्यात सध्यातरी अनेक भागांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे कापसाची स्थिती चांगली आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता कापसाची मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिकपटीने वाढणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार असून, पहिल्याच मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे ११ हजार १७५ रुपयांचा रेकॉर्डब्रेक भाव मिळाला आहे.

काय आहे कारण...

१. अमेरिका जगातील सर्वात मोठा कापूस निर्यातदार देश असून, या देशात सुमारे २ कोटी ५० लाख गाठींचे उत्पादन केले जाते. तसेच या सर्व मालाची अमेरिकेकडून निर्यात केली जात असते.
२. अमेरिकेतील टेक्सास, कॅलीफोर्नीया या मोठ्या राज्यांमध्ये देशातील एकूण कापूस लागवडीच्या सुमारे ५० टक्के उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा याच राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे.
३. दुष्काळामुळे अमेरिकेच्या कापूस उत्पादनात २० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अमेरिकेकडून होणाऱ्या निर्यातमध्ये घट होणार आहे.
४. अशा परिस्थितीत चीन, बांग्लादेश, व्हिएतनाम, पाकिस्तान अशा देशांनाही भारताकडून निर्यात वाढवावी लागणार आहे. त्यामुळे भारतीय बाजारात कापसाची मागणी वाढेल व दर देखील चांगला मिळण्याची शक्यता आहे.

सर्वात जास्त कापसाचे उत्पादन घेणारे देश
चीन - ५ कोटी गाठी
भारत - ३ कोटी ५० लाख गाठी
अमेरिका - २ कोटी ५० लाख गाठी

- चीनमध्ये जरी कापसाचे उत्पादन सर्वाधिक होत असले तरी हे उत्पादन चीनच्या मार्केटसाठी कमी पडते. त्यामुळे चीन मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करत असतो.
- भारतात दरवर्षी ३ कोटी ५० लाख गाठींचे उत्पादन होत असते, मात्र यंदा भारतात कापसाचे क्षेत्र वाढल्याने यंदा ३ कोटी ७० लाख गाठींपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता आहे.
- अमेरिकेतील उत्पादन कमी होणार असल्याने, चीन, पाकिस्तान, व्हीएतनाम, बांग्लादेश यांना भारताकडून होणाऱ्या निर्यातीत वाढ करावी लागणार आहे.
- त्यातच भारतातील सुत गिरण्या वेगाने सुरु असल्याने कापसाला देशातंर्गत  मागणी कायम राहणार असल्याने कापसाचे भाव वाढणार आहेत.


अमेरिका हा सर्वातमोठा निर्यातदार देश आहे. मात्र, त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात दुष्काळ असल्याने अमेरिकेतील उत्पादनात घट होणार आहे. त्याचा फायदा भारताला होणार असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाव देखील वाढतील.
-हर्षल नारखेडे, कॉटन मार्केटचे अभ्यासक

Web Title: US drought on the path of Indian cotton growers, white gold get high rate in market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.