पारोळा : येथील पीक विमा कार्यालयात नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत कार्यालय उघडलेच नाही. परिणामी रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अमोल पाटील यांची भेट घेत व्यथा मांडल्या. त्यावर सभापती पाटील यांनी तत्परतेने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्याना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला अन् कार्यालय तत्काळ उघडले.
पारोळा शहरासह ग्रामीण भागात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंताग्रस्त होऊन मेटाकुटीस आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा काढला आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमाची नुकसानभरपाई अर्थात अर्थसहाय्य करण्यात येते. त्यासाठी नुकसानीचा अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्या नुकसानीचा अर्ज सादर करण्यासाठी शेतकरी पीक विमा सकाळी नऊपासून ताटकळत उभे होते. परंतु कार्यालय दुपारी १२ वाजेपर्यंत उघडलेच नाही. परिणामी शेतकरी हतबल झाले व शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
सभापती अमोल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा, समस्या जाणून घेत तत्परतेने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदार अनिल गवांदे, तालुका कृषी अधिकारी, विमा कार्यालयाचे प्रतिनिधी अमोल सोनवणे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्याबाबत सूचना केल्या, अन् १० मिनिटांतच कार्यालय उघडल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांनी सभापती अमोल पाटील यांचे आभार मानले. यावेळी तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, बाजार समितीचे संचालक मधुकर पाटील, विश्वास चौधरी यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.