वैष्णव संप्रदायाचा वारसा जोपासत ९७ वर्षांच्या व्रतस्थ योगियाची अखंड योगसाधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST2021-06-21T04:12:43+5:302021-06-21T04:12:43+5:30
रावेर : हरिनामाच्या नामस्मरणात तदाकार होऊन मोक्षप्राप्तीचा परमानंद उपभोगताना आत्म्यातून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी देहरूपी शरीराची साधना निकोप व निर्लेप ठेवण्यासाठी ...

वैष्णव संप्रदायाचा वारसा जोपासत ९७ वर्षांच्या व्रतस्थ योगियाची अखंड योगसाधना
रावेर : हरिनामाच्या नामस्मरणात तदाकार होऊन मोक्षप्राप्तीचा परमानंद उपभोगताना आत्म्यातून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी देहरूपी शरीराची साधना निकोप व निर्लेप ठेवण्यासाठी तालुक्यातील पुनखेडा येथील प्रगतिशील शेतकरी तथा श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानचे विश्वस्त रामभाऊ उघडू पाटील हे आपल्या वयाच्या ९७ व्या वर्षीही अखंड योगसाधना करणारे वैष्णव संप्रदायातील योगिया ठरले आहेत. त्यांच्या जलतरणावरील योगसाधना तथा सर्वांगसुंदर अशा योगासनांची तरलतम योगसाधना फास्टफूडच्या जमान्यातील मधुमेह व रक्तदाबाला सहजगत्या बळी पडणाऱ्या युवकांना लाजविणारी ठरली आहे.
पुनखेडा या भोकर नदी तीरावरील गावाला श्रीक्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिराचा सहवास लाभला आहे. त्या पार्श्वभूमीवर सात्त्विक व धार्मिक कुटुंबाचे धनी असलेल्या रामभाऊ पाटील यांना बालपणापासूनच धार्मिक संस्कांराचं बाळकडू मिळाले आहे.
बालपणातून युवावस्थेतील पदार्पणातच त्यांना व्यायामाचा व्यासंग जडला. श्रीक्षेत्र ओंकारेश्वर महादेवाच्या सान्निध्यात वैष्णव संप्रदायाचा घरात अव्याहत चालत आलेला वारसा कायम ठेवत त्यांनी आपली योगसाधना अव्याहतपणे सुरू ठेवली. वैष्णव संप्रदायात श्रीमद् भगवद्गीतेच्या तथा संत ज्ञानेश्वरीच्या ओव्या मुखोद्गत असलेल्या रामभाऊ पाटील यांना हरिनामाच्या अखंड नामचिंतनातून मोक्षप्राप्तीचा परमानंद साधण्याची जशी अवीट गोडी लागली, तशीच अवीट गोडी आपल्या आत्म्यातून परमात्म्याची अनुभूती लाभण्यासाठी निर्लेप व निकोप देहयष्टी साधण्याची गोडी लागली.
परमेश्वराच्या नामचिंतनात तदाकार होण्यासाठी एकचित्त एकमग्न होणे गरजेचे ठरत असल्याने तपोसाधना व योगसाधना या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे माहात्म्य त्यांनी ओळखले. किंबहुना, नाशिक, उज्जैन, वाराणसी, प्रयागराज येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यातील ऋषी-मुनींकडून त्यांनी योग साधनेचे धडे घेऊन आपली अव्याहत योगसाधना जोपासली आहे.
शरीराच्या प्रत्येक अवयव व सांध्यांना व्यायाम देणाऱ्या योगासनांची साधना आपल्या ९६ व्या वर्षीही सहजगत्या तरलतम पद्धतीने करताना रामभाऊ पाटील यांनी स्वतःचे दैनंदिन आहार, विहारावर व्रतस्थपणे नियंत्रण मिळविले आहे. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून तासभर वाचन करून तासभर ते नित्यनेमाने योगसाधना करतात. सर्वांगसुंदर योगसाधना करताना ते उत्कृष्ट जलतरणपटू असल्याने त्यांनी जलतरणावरील योगसाधना आत्मसाधना करताना मुखी हरिनामाचा गजर करीत वयाच्या ९७ व्या वर्षी योगसाधना करणारा खरा योगिया असल्याची अनुभूती दिली आहे.
त्यांचे नाक, कान, डोळे, दात आजही शाबूत असून, चष्म्याची गरज नाही. तसेच पायी प्रवास करीत विहारावर जास्त लक्ष केंद्रित असल्याने जवळचा प्रवास ते टाळतात. त्यांना रक्तदाब वा मधुमेह अशी कोणतीही व्याधी नसून फास्टफूडच्या युवावर्गाला लाजविणारी त्यांची योगसाधना ठरली आहे. रावेर शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष डॉ.एस.आर. पाटील व माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील यांचे ते आजोबा आहेत.