संपूर्ण देशात मागासवर्गीय असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:18 PM2018-05-26T23:18:37+5:302018-05-26T23:18:37+5:30

भीमराव यशवंत आंबेडकर : आरएसएसचाही सरकारवर प्रभाव

Underground unsafe in the whole country | संपूर्ण देशात मागासवर्गीय असुरक्षित

संपूर्ण देशात मागासवर्गीय असुरक्षित

googlenewsNext
ठळक मुद्दे१९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. महासभेच्या विचारपीठावरच १९५६ मध्ये धर्मांतराचे रणशिंग फुंकले गेले. देशभरात बौद्ध महासभेतर्फे राजकारणविरहीत मागासवगीर्यांची श्रामणेर शिबिरे, प्रबोधन मेळावे, परिषदा घेतल्या जातात. बौद्ध संस्कारीत पिढी घडविण्याचे काम महासभा करते.सद्य:स्थितीत धम्म परिषदा घेतल्या जात असून, हिंदी भाषिक राज्यांमध्ये याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे भीमराव आंबेडकर यांनी सांगितले. आंबेडकर हे महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू आहेत.

जिजाबराव वाघ ।
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि.जळगाव, दि. २६ : केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होत असले तरी, सर्वच पातळीवर सरकार अपयशी ठरले आहे. चार वर्षात मागासवर्गीयांवर होणारे हल्ले वाढले असून, सरकारवर अप्रत्यक्षरित्या आरएसएसचा प्रभाव आहे. यामुळेच संपूर्ण देशात मागासवर्गीयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असल्याचे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
चाळीसगाव येथे आयोजित बौद्ध महासभेतर्फे शनिवारी बौद्ध धम्म परिषद झाली. त्यासाठी ते येथे आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न : दलित ऐक्य व्हावे असे तुम्हाला वाटते का?
आंबेडकर : मागासवर्गीय नेतृत्वाने राजकीय पक्षात जाऊन विश्वासार्हता गमावली आहे. स्वयंघोषित नेतृत्व ऐक्याची भाषा करते. तथापि, त्याला जनाधार नाही. ऐक्य झाले नाही तरी काही बिघडणार नाही. प्रत्येकाने आपल्या पातळीवर हा लढा सुरू ठेवला पाहिजे.
प्रश्न : आगामी निवडणुकांमध्ये ‘भारिप’ची भूमिका काय?
आंबेडकर : आव्हान म्हणूनच अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक आम्ही लढवित आहोत. राज्यभरात भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. जातीयवादी शक्तींशी मुकाबला करण्यासाठी धर्मनिरपेक्ष आघाडीत सन्मानाने सामिल होऊ, अशी भूमिका स्वत: डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील जाहीर केली आहे.
प्रश्न : सरकारवर आरएसएसचा प्रभाव आहे, असे वाटते का?
आंबेडकर : भाजपाची मातृसंस्थाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. केंद्रच नव्हे तर राज्यातील सरकारवरही आरएसएसचा प्रभाव आहे. जातीय विचारसरणीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानावर विश्वास नाही. यामुळे लोकशाहीच्या चारही स्तंभांवर आघात होत आहे. जातीय हिंसाचार आणि दंगली हे त्याचेच उदाहरण आहे. न्यायालय आणि नोकरशाहीची गळचेपी होत आहे. आरएसएसच्या प्रभावाची ही काही उदाहरणे आहेत.
प्रश्न : निवडणुकांमध्ये बहुजन वर्गाची काय भूमिका असेल?
आंबेडकर : देशभर दौरे सुरू आहेत. देशात केंद्र सरकारच्या विरोधात मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि बहुजन वर्गात असंतोष धुमसत आहे. समाजाच्या विविध घटकात सरकारविषयी संतापाची लाट आहे. गुजरात आणि कर्नाटक निवडणुकीत याचे पडसाद उमटले.
प्रश्न : भीमा-कोरगाव दंगलीबद्दल काय सांगाल?
आंबेडकर : ही दंगल सरकार पुरस्कृतच होती. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने सरकारचा दलितविरोधी चेहरा समोर आला. पुरावे देऊनही दंगल घडविणारे मोकाट आहेत. भारिप बहुजन महासंघाने याबाबत पोलीस यंत्रणेला खरबदारीच्या सूचनाही दिल्या होत्या.
प्रश्न : व्यक्तिकेंद्री राजकारणाने न्यायसंस्थेला घेरले आहे का?
आंबेडकर : देश आणि संविधानापेक्षाही आपण मोठे आहोत, असे सध्याच्या केंद्रीय नेतृत्वाचे वर्तन आहे. याचा फटका न्यायसंस्थेसह स्वायत्त संस्थांनाही बसत आहे.




 

Web Title: Underground unsafe in the whole country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.