भाच्याला वाचविण्यास गेलेला मामाही बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:10 IST2019-10-02T22:10:41+5:302019-10-02T22:10:46+5:30
हृदयद्रावक घटना : गिरणा नदीपात्रात बुडून दोघांचा मृत्यू

भाच्याला वाचविण्यास गेलेला मामाही बुडाला
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : गिरणा नदीपात्रात भातखंडे खुर्द केटीवेअरमध्ये मासे पकडण्यास गेलेल्या भाच्याला वाचविण्यास गेलेला मामाही भाच्यासह बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यातील भातखंडे खर्दु येथे बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असून भातखंडे खुर्द येथील केटीवेअर फुल्ल भरला आहे. २ रोजी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास सागर मंगलदास ठाकरे (वय १८) रा.भातखंडे खुर्द हा युवक मासे पकडण्यासाठी नदीपात्रातील केटीवेअरमध्ये गेला. तिथे मासे पकडताना तो पाण्यात बुडाल्याचे समजले. गावातीलच मामा जगदीश जगन सोनवणे (वय ३२) रा भातखंडे खु याने भाच्याला वाचविण्यास उडी घेतली असता मामाही पाण्यात बेपत्ता झाला. मामा भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावातील नागरिकांनी शोधकार्य सुरू केले. मात्र आढळून आले नाही. सागर हा एकुलता एक असून त्याच्या पश्चात फक्त आई आहे. तर जगदीश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, $लहान मुली असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.