भुसावळला नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2023 23:00 IST2023-05-21T23:00:05+5:302023-05-21T23:00:28+5:30
सध्या तापमान वाढले असल्याने अनेक नागरिक दुपारी अथवा सायंकाळी तापी नदीत पोहण्यासाठी जात असतात.

भुसावळला नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू
- नरेंद्र पाटील
भुसावळ : तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. शेख दानिश (१७) आणि अंकुश ठाकूर (१७, रा. ३२ खोली, खडका रोड, भुसावळ) अशी या मयत तरुणांची नावे आहेत.
सध्या तापमान वाढले असल्याने अनेक नागरिक दुपारी अथवा सायंकाळी तापी नदीत पोहण्यासाठी जात असतात. खडका रोड भागातील हे दोन तरुण दुपारी साडेतीन वाजता नदीत पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. हा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आला. त्यांनी मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.
दोघांना बाहेर काढण्यासाठी राहुलनगरातील मासेमारी करणाऱ्या युवकांची मदत घेण्यात आली. तब्बल तीन तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती दोन्ही मुलांच्या घरी कळविण्यात आली. त्यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. त्यांचा मृतदेह पाहताच परिवारातील लोकांनी एकच हंबरडा फोडला.