Two young people hit stones | दोन तरुणांनी दगडांचा मारा केल्याने बिबट्याची धूम
दोन तरुणांनी दगडांचा मारा केल्याने बिबट्याची धूम

जळगाव : शेतात निंदणी सुरु असताना एका महिलेवर अचानक बिबट्याने झडप घातली़ ते पाहून समोरच असलेल्या तिच्या पतीने अंगातील सारे बळ एकवटून तब्बल १० ते १५ मिनिटे बिबट्याशी झुंज दिली़ त्याचवेळी मदतीला आलेल्या दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता बिबट्यावर दगडांचा मारा केला. या आक्रमणाने बिबट्याने दोन पावले मागे हटत तिथून पळ काढला़ जीवाचा थरकाप उडविणारी ही घटना वरसाडे तांडा (ता. पाचोरा) येथे रविवारी दुपारी १२ वाजता घडली़
या घटनेत भारत सरिचंद चव्हाण (३०) व त्यांची पत्नी मनिषा भारत चव्हाण (२३, रा़ वरसाडे तांडा़ ता़ पाचोरा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगावच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे़त.
भारत आणि बिबट्या यांच्यात सुरू असलेल्या झटापटीत आजूबाजूचे लोकही तिथे आले पण समोर प्रत्यक्ष बिबट्या असल्याचे पाहून तेही मागे सरकले. भितीपोटी कुणीही मदतीला सरसावले नाही़ काही वेळाने तिथे असलेल्या नंतर दोन तरूणांनी बिबट्यावर दगडांचा मारा सुरु केला. यामुळे बिबट्याने शेतातून पळ काढला.
दरम्यान, या घटनेत भारत व त्याची पत्नी मनिषा हे गंभीर जखमी झाले़ त्यांना त्वरित पिंपळगाव हरेश्वर येथे रूग्णालयात नेण्यात आले़ त्यानंतर त्वरित जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
भारत यांच्या डोळे, छाती आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. डोळ्याजवळून रक्तस्त्रात सुरू होत होता. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती.
बिबटयाशी झटापट सुरु असताना त्याच्या रुपाने आपण साक्षात मृत्यू पाहिल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.
चव्हाण यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण दाम्पत्य हे शेतात मजुरी करून घराचा उदरनिर्वाह करतात़ रविवारी गावातील शेतात त्यांना निंदणीची कामे मिळाली़ त्यामुळे दोघेही सकाळीच शेतात पोहचले. मनिषा या बाजरीच्या शेतात काम करित असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने त्यांच्या झडप घालत त्यांच्या कमरेला चावा घेतला़ त्याचवेळी भारत हे काही फूटावर काम करीत होते. बिबट्याने पत्नीवर हल्ला केल्याचे लक्षात येताच त्यांनी बिबट्यापासून पत्नीची कशी- बशी सुटका केली़ तोच बिबट्याने भारत यांच्यावर हल्ला चढविला़ यात दोघांमध्ये तब्बल १० ते १५ मिनिटे झुंज सुरू होती. बिबट्याने भारत याच्या हाताला पकडून ठेवले होते़ त्यामुळे भारत हे दुसऱ्या हाताने त्याच्यावर दगडाने मारा करीत होते़ बिबट्याला त्यांनी पाया खाली दाबले़


Web Title:  Two young people hit stones
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.