पोटातील गाठी काढून दोन महिलांना दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:17+5:302021-02-05T06:01:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन महिलांच्या पोटातील अंडाशयाला असलेल्या भल्या मोठ्या गाठी काढून या महिलांना ...

पोटातील गाठी काढून दोन महिलांना दिले जीवदान
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन महिलांच्या पोटातील अंडाशयाला असलेल्या भल्या मोठ्या गाठी काढून या महिलांना जीवदान देण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाला यश आले आहे. यातील एक महिला वर्षभरापासून योग्य उपचारांअभावी फिरत होती. या दोन्ही महिलांची प्रकृती उत्तम असून त्यांना दोन दिवसात डिस्चार्जही मिळणार असल्याची माहिती आहे.
प्रथमदर्शनी ही कॅन्सरची गाठ नसल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही ती मोठी गाठ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. नॉन कोविड सुरू झाल्यापासूनच्या या दोन सर्वात मोठ्या शस्त्रक्रिया असल्याचे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले. अशा गाठी होण्यामागे नेमकी कारणे नसतात, मात्र, उपचारास उशीर जीवावर बेतू शकतो, रुग्ण शॉकमध्ये जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
पहिली महिला : ही महिला चोपडा तालुक्यातील रामपूर येथील शेतमजुरी करणारी गरीब कुटुंबाशी निगडित ४० वर्षीय महिला आहे. वर्षभरापूर्वीच पोटात दुखत होते. मात्र, लॉकडाऊन गरिबीची परिस्थिती त्यामुळे ही महिला योग्य उपचारांपासून वंचित होती. सहा महिन्यापूर्वी सोनेाग्राफीमध्ये महिलेच्या पोटातील अंडाशयाला गाठ असल्याचे समोर आले होते. १८ रोजी चोपडा उपजिल्हारुग्णालय आणि नंतर अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आल्यानंतर स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या टीमने या महिलेच्या पोटातील ही गाठ काढली. ४० मिनिटात ही शस्त्रक्रिया पार पडली. ही गाठ साधारण ३० सेमी बाय २० सेमी एवढी होती. गंभीर बाब म्हणजे गाठीला पीळ बसल्याने त्यात रक्तस्राव झाला होता.
दुसरी महिला : ही धरणगाव येथील ३८ वर्षीय महिला आहे. महिलेच्या पोटात असह्य वेदान होत होत्या, महिलेचे तीन वेळा सीझर झाल्यामुळे महिलेवर उपचार करण्यास खासगी रुग्णालयांनी नकार दर्शविला होता. सुरत येथूनही कुटुंबीय परत आले होते. अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची तपासणी झाल्यानंतर महिलेच्या दोनही अंडाशयांना गाठी असल्याचे समोर आले. महिलेला जीवदान देण्यासाठी धोका पत्करून डॉ. बनसोडे व टीमने १९ रोजी महिलेच्या दोन्ही अंडाशयातील पू काढून गाठी नष्ट करण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे.
शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ व विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे, डॉ. सोनाली मुपडे, डॉ. कांचन चव्हाण, भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पाटील, डॉ. काजल साळुंखे, परिचारिका हेमलता जावळे, सोनाली पाटील यांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केल्या.