सोनसाखळी लांबविणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST2021-09-18T04:18:47+5:302021-09-18T04:18:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने धूम स्टाइलने सोनसाखळी लांबविणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश आले ...

The two who were carrying the gold chain were arrested | सोनसाखळी लांबविणारे दोघे जेरबंद

सोनसाखळी लांबविणारे दोघे जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने धूम स्टाइलने सोनसाखळी लांबविणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश आले आहे. संदीप रोहिदास सोनवणे (३३, रा.नाशिक) व सतीश गोविंद चौधरी (३३, रा. मालेगाव) असे अटक केलेल्या दोन्ही चोरट्यांची नावे असून, त्यांनी शहरात आठ ठिकाणी धूम स्टाइलने सोनसाखळ्या लांबविल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

चैतन्यनगर येथील प्रमिला बालकिसन सोमाणी या दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पपईची साल फेकण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. त्या घराकडे परतत असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली होती. त्यानंतर सोमाणी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्याआधीदेखील शहरातील सोनसाखळीच्या घटना घडल्या असल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हापेठ पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. घटनास्थळी जावून सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, त्यात सोनसाखळी चोरटे पोलिसांना दिसून आले होते. त्याशिवाय जळगावप्रमाणे ८ सप्टेंबर रोजी देखील औरंगाबाद येथे सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. त्यामुळे जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद जाणारे सर्व ढाबे, लॉजिंगची तपासणी केली होती.

एकाला नाशिक, तर दुसऱ्याला मालेगावातून अटक

दरम्यान, चोरटे नाशिक येथे असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर नाशिक गाठून पोलिसांनी सलग पास दिवस चोरट्यांचा शोध घेतला. अखेर संदीप सोनवणे याला नाशिक येथून अटक करण्यात आली. कसून चौकशी केली असता, त्याने मालेगावातील साथीदार सतीश चौधरी यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुरुवारी मालेगाव येथून सतीश याला अटक केली.

यांनी केली कारवाई

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, सलीम तडवी, रवींद्र साबळे, विकास पहुरकर, समाधान पाटील, विनोद पाटील आदींनी ही कारवाई केली आहे.

Web Title: The two who were carrying the gold chain were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.