२० फूट खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:22+5:302020-12-04T04:46:22+5:30
जखमी - ०४ सीटीआर ५३ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महार्गावर पाइप टाकण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. सायंकाळच्या ...

२० फूट खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी
जखमी - ०४ सीटीआर ५३
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महार्गावर पाइप टाकण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास अंधारामुळे दुचाकीस्वाराला हा खड्डा न दिसल्याने तो दुचाकीसह थेट २० फूट खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्याची गणपती हॉस्पिटलजवळ घडली. दीपक दत्तू चौधरी (रा. फूपनगरी, ता़ जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे़. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.
शहरातून गेलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. गणपती हॉस्पिटलजवळ सांडपाण्याचे ड्रेनेज काढण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे. यासाठी महामार्गावर सुमारे २० फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. दरम्यान, आरओ सर्व्हिसिंगचे काम करणारे फूपनगरातील रहिवासी दीपक चौधरी हे गुरुवारी सायंकाळी अजिंठा चौफुलीकडून गोलाणी मार्केटमध्ये असलेल्या कार्यालयाकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाले. आकाशवाणी चौफुली ओलांडल्यानंतर गणपती हॉस्पिटलजवळून जात असताना महामार्गावरील अंधारामुळे समोर २० फूट खोल खड्डा त्यांना दिसला नाही. ते दुचाकीसह थेट त्या खड्ड्यात पडले, यात त्यांच्या छातीसह दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली.
खासगी रुग्णालयात उपचार
दीपक चौधरी हे दुचाकीसह खड्ड्यात पडल्याचे महामार्गावरील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दीपक यांना बाहेर काढीत खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, हा खड्डा अंधारामुळे दिसत नसल्यामुळे पुन्हा अपघात होऊ शकतो. तसेच अपघातानंतर त्याठिकाणी फलक लावण्यात आल्यानंतर नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.
दोन दिवसांपूर्वीच घेतली होती दुचाकी
दीपक चौधरी यांनी कामासाठी दोन दिवसांपूर्वीच नवीन दुचाकी घेतली होती. महामार्गावर पथदिवे नसल्यामुळे त्यांना खड्डा दिसला नाही. त्यामुळे हा अपघात झाला. दीपक हे दुचाकीच्या खाली अडकले नाही अन्यथा गंभीर घटना घडली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.