पाळधीजवळून दोघा दुचाकीचोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:16 IST2021-05-08T04:16:42+5:302021-05-08T04:16:42+5:30
एलसीबीची कारवाई : तीन दुचाकी हस्तगत जळगाव : जिल्ह्यातून दुचाकी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांच्या पाळधी गावाजवळून ...

पाळधीजवळून दोघा दुचाकीचोरांना अटक
एलसीबीची कारवाई : तीन दुचाकी हस्तगत
जळगाव : जिल्ह्यातून दुचाकी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांच्या पाळधी गावाजवळून मुसक्या आवळण्यास एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. प्रवीण संभाजी पाटील (३०, रा. ब्राह्मणे, ता. एरंडोल), सागर सुभाष धनगर (२२, रा. निमगाव, ता. यावल), अशी अटक केलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. दोघांकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
एरंडोल येथील प्रवीण पाटील हा तरुण जिल्ह्यातून दुचाकी लांबवत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. प्रवीण आणि त्याचा साथीदार हे दुचाकीने पाळधी गावाजवळील महामार्गावरून जाणार आहेत, हे कळताच पथकाने शुक्रवारी सकाळी महामार्गाजवळ सापळा लावून दोघांना पकडले. त्यांची कसून चौकशी केली असता, ज्या दुचाकीवरून दोघे जात होते तीदेखील चोरीची असल्याची माहिती समोर आली व एक वर्षाआधी एरंडोल येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. सोबत पारोळा व यावल येथून चोरलेल्या दुचाकी पोलिसांना त्यांनी काढून दिल्या. पुढील कार्यवाहीसाठी दोघाना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
...यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील, राजेंद्र पवार, भारत पाटील आदींनी ही कारवाई केली आहे.