एका हाताने देणार दोन हजार, तर खते व इंधन दरवाढीने शेतकरी बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST2021-06-04T04:13:54+5:302021-06-04T04:13:54+5:30
एरंडोल : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपल्यावर लागलीच खते व पेट्रोल- डिझेलची दरवाढ झाल्यामुळे शेतकरी कमालीचा बेजार झाला आहे. ...

एका हाताने देणार दोन हजार, तर खते व इंधन दरवाढीने शेतकरी बेजार
एरंडोल : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपल्यावर लागलीच खते व पेट्रोल- डिझेलची दरवाढ झाल्यामुळे शेतकरी कमालीचा बेजार झाला आहे. रासायनिक खतांचे भाव २०० ते ९०० रुपयांदरम्यान वाढले आहेत, तर काही ठिकाणी पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तालुक्यासह खान्देशात पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळपास पोहोचले आहेत. शनिवारी डिझेलचा भाव ९८ रुपये ९० पैसे होता.
शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना २ हजार मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. एका हाताने देण्यात येणार तुटपुंजी रक्कम, तर दुसऱ्या हाताने रासायनिक खतांच्या व पेट्रोल दरवाढीचा डोस दिला जाणार आहे. एरंडोल तालुक्यात खरिपाचे क्षेत्र ३९ हजार ९३७ हेक्टर आहे. खरीप पेरण्यांसाठी तालुक्यातील ३५ हजार ८८० शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. उन्हाळी पिकांची काढणी करून, काडी-कचरा वेचून शेतजमिनीची पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. यावर्षी खरिपासाठी ५ हजार १२० टन युरियाची गरज असून, सिंगल सुपर फॉस्फेट २ हजार २४० टन लागणार आहे. न्युरेटा पोटॅश २ हजार ३२० टन लागणार आहे. डीएपी-६०० टन व इतर प्रकारच्या खतांची तालुक्यासाठी एकूण १३ हजार ८०० मे. टन इतकी गरज भासणार आहे.
दरम्यान, रासायनिक खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेष हे की, शेतकऱ्यांचा शेतीमाल तयार झाला की, शेतमालाचे भाव कोसळतात. याउलट पेरणीलायक पाऊस पडत नाही, त्याच्या आधीच शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या दरवाढीचा फटका बसला आहे. शेतीकामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर व शेतावर जाण्यासाठी लागणारी दुचाकी यामुळे इंधन दरवाढीचा मोठा भार शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे.