जळगाव : अयोध्या येथील राममंदिर व बाबरी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या काही दिवसात निकाल अपेक्षित असून त्यापार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १९९२ पासून काही संशयास्पद लोकांचे रेकॉर्ड काढण्यात आले असून त्याची तीन प्रकारात वर्गवारी करण्यात येत आहेत. दोन्ही समुदायातील साधारण दोन हजाराच्यावर संशयित व्यक्तींवर पोलिसांची नजर राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.अयोध्या येथील राममंदिर-बाबरी मशिदीबाबतचा निकाल १७ नोव्हेंबरच्या आधी दिला जाण्याची शक्यता आहे. अतिशय संवेदनशील विषय असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी रविवारी तातडीची गुन्हे आढावा बैठक घेतली.जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनच्या हद्दीत शांतता समितीच्या बैठका घेण्याचे आदेश दिले. मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातही स्वत: उगले यांनी शांतता समितीची बैठक घेऊन निकालानंतर काय खबरदारी घ्यावी याच्या सूचना केल्या.जिल्ह्यात हॉटस्पॉटवर विशेष लक्षजिल्ह्यात सीमीचे जाळे, जातीय दंगलीचे ठिकाण, संवेदनशील शहर व गावे यांचे हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. त्याशिवाय रेकॉर्डवर असलेल्यांची नावे, दंगलीच्या गुन्ह्यातील नावे व सहभाग त्याशिवाय कधीच रेकॉर्डवर आलेले नाहीत, साधी अदखलपात्र गुन्ह्याचीही नोंद नाही, पडद्यामागे राहून सूत्रे हलविणाऱ्या लोकांची यादी तयार करुन वर्गवारी करण्यात येत आहे.या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. बकरी ईद आणि अयोध्या निकाल ही दोन प्रकरणे सध्या संवेदनशील आहेत. आतापासूनच बाहेरील बंदोबस्त जिल्ह्यात दाखल झाला आहे. त्यात दोन हजार होमगार्ड व एसआरपी कंपनीचा समावेश आहे. शेजारील मध्य प्रदेश व जिल्ह्यातील सिमेवरील अधिकाºयांच्याही बैठका घेण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.उगले यांनी सांगितले.अफवा व व्हायरल संदेशवर नजरया काळात सोशल मिडीयावरुन अफवा पसरविणारे संदेश व्हायरल होत असतात. या संदेशामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. प्रत्येक मेसेज व कोण काय बोलतं यावर या यंत्रणेचे लक्ष राहणार आहे.
जिल्ह्यातील दोन हजार जण पोलिसांच्या नजरकैदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 14:51 IST