दोन तळीरामांचा पोलीस ठाण्यात धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:06+5:302021-07-18T04:13:06+5:30
रावेर : दोन तळीरामांनी नशेत शिवीगाळ व पोलिसाची कॉलर पकडत पोलीस ठाण्याच्या आवारात धिंगाणा घातला. यापैकी एकाने सॅनिटायझर पिऊन ...

दोन तळीरामांचा पोलीस ठाण्यात धिंगाणा
रावेर : दोन तळीरामांनी नशेत शिवीगाळ व पोलिसाची कॉलर पकडत पोलीस ठाण्याच्या आवारात धिंगाणा घातला. यापैकी एकाने सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दोघांना अटक करण्यात आली आहे.
अतुल सुभाष महाजन (३३, रा. अष्टविनायक नगर रावेर) आणि प्रफुल्ल जगदीश महाजन (२५, रा. संभाजी नगर, रावेर) अशी या आरोपींची नावे आहेत.
रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रावेर पोलीस ठाण्याच्या आवारात कॉ. सचिन गायकवाड हे गार्ड ड्युटीवर होते. त्याचवेळी अतुल महाजन व प्रफुल्ल महाजन हे दोघे नशेतच पोलीस ठाण्यात आले आणि मोठमोठ्याने आरडाओरड करीत पोलिसांना शिवीगाळ केली. त्यावेळी गायकवाड यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अतुल याने त्यांची कॉलर पकडली व प्रफुल्ल याने ओढाताण केली.
यानंतर दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांच्या दालनात अतुल याने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हा पोलिसांना कामाला लावतो, अशी धमकीही दिली.
याप्रकरणी सचिन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्या. ए. एच. बाजड यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास रावेरचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे करीत आहेत.