उपमुख्याधिकाऱ्यावर चाकूहल्ला करून लुटणाऱ्या दोघांना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:11+5:302021-09-22T04:20:11+5:30
अमळनेर : नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर चाकूहल्ला करून, ५ हजार रुपये लुबाडणाऱ्या दोघांना न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली ...

उपमुख्याधिकाऱ्यावर चाकूहल्ला करून लुटणाऱ्या दोघांना सक्तमजुरी
अमळनेर : नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर चाकूहल्ला करून, ५ हजार रुपये लुबाडणाऱ्या दोघांना न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
संदीप गायकवाड हे २ नोव्हेंबर, २०१९ रोजी रात्री साडेअकरा वाजता नाशिक येथे जाण्यासाठी धुळे रोडवर साई प्रसाद हॉटेलसमोर दुभाजकावर बसले असताना, धुळ्याकडून मोटारसायकल क्रमांक एम.एच. १९, ७५०३ वर कुणाल विजय शिंपी रा.शिवशक्ती चौक बाहेरपुरा, आकाश शंकर शिंदे रा.गलवाडे रोड व अन्य एक अल्पवयीन हे तिघे आले व त्यांनी गायकवाड यांच्या हातातून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गायकवाड यांनी मोबाइल घट्ट धरून ठेवला. पुन्हा ११ वाजून ४० मिनिटांनी तिघे परत येऊन, त्यांनी गायकवाड यांच्या वरच्या खिश्यातून पाच हजार काढून घेतले आणि डाव्या बरगडीवर व दोन ठिकाणी मांडीवर चाकूने हल्ला करून पळून गेले होते. गायकवाड यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध जबरी चोरी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याने, त्याचा खटला बाल न्यायालयात पाठविण्यात आला, तर कुणाल व आकाश यांच्याविरुद्ध अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू होता. सरकारी वकील ॲड.किशोर बागुल यांनी यात ११ साक्षीदार तपासले. त्यात तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक जी.बी. सूर्यवंशी, डॉ.जी.एम. पाटील, डॉ.नीलेश गोराने, डॉ.निर्मल चौधरी, आरिफ खान नायब तहसीलदार कमलाकर जोशी यांची साक्ष आणि गायकवाड यांनी आरोपींना जिल्हा कारागृहात व न्यायालयात ओळखल्याने जिल्हा सत्र न्या.व्ही.आर. जोशी यांनी कुणाल शिंपी व आकाश शिंदे यांना सात वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अल्पवयीन आरोपीचा खटला बाल न्यायालयात प्रलंबित आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल चोरीची निघाली होती. त्याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. पैरवी अधिकारी म्हणून हिरालाल पाटील यांनी काम पाहिले.