द्विसदस्यीय पद्धतीचा महाविकास आघाडीला होणार फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST2021-09-24T04:21:22+5:302021-09-24T04:21:22+5:30
अमळनेर : नगरपालिकेच्या निवडणुकीत द्विसदस्यीय पद्धत अवलंबण्यात येणार असल्याने महाविकास आघाडीला त्याचा फायदा होणार असून, भाजपला शह देण्याचा हा ...

द्विसदस्यीय पद्धतीचा महाविकास आघाडीला होणार फायदा
अमळनेर : नगरपालिकेच्या निवडणुकीत द्विसदस्यीय पद्धत अवलंबण्यात येणार असल्याने महाविकास आघाडीला त्याचा फायदा होणार असून, भाजपला शह देण्याचा हा प्रयत्न आहे, मात्र यात क्रियाशील आणि लोकप्रिय व्यक्तींना अधिक संधी मिळणार आहे.
अमळनेर पालिकेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. सध्या काँग्रेस चार, राष्ट्रवादी आठ, सेना चार, भाजप एक, शिरीष चौधरी मित्रपरिवार दहा आणि इतर अपक्ष असे बलाबल आहे. अमळनेर शहरात भाजपचे वर्चस्व होते. मात्र महाविकास आघाडीत काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याने सर्व मिळून ताकद लावली जाईल. एखाद्या पक्षाचा उमेदवार कमजोर पडला तरी त्याला इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळाने विजयाकडे नेण्यात येईल.
द्विसदस्यीय पद्धतीमुळे प्रभाग मोठा होईल, त्यामुळे नगरसेवक पदासाठी कस लागेल. भ्रष्ट मार्गाने मत मिळवणे अधिक खर्ची पडेल. तसेच जो अधिक लोकप्रिय असेल त्याला लोक अधिक प्राधान्य देतील. एकत्र दोन नगरसेवक निवडले गेल्याने संपूर्ण प्रभागाची जबाबदारी दोघांवर आल्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. काही वेळा आरक्षण निघाल्याने चांगल्या उमेदवाराला संधी मिळत नाही. अशावेळी एक आरक्षित झाला, तरी दुसऱ्या जागेवर संधी मिळते.
महाविकास आघाडीने सामाजिक व प्रादेशिक समतोल राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे चांगल्या उमेदवाराला आरक्षण अथवा जातीची अडचण येणार नाही, त्याची संधी हुकणार नाही.
-अनिल पाटील, आमदार, अमळनेर.
तिन्ही पक्षांचे उमेदवार एकाच महाविकास आघाडीतर्फे दिले जातील, त्यामुळे एकमेकांची मदत होऊन आघाडीला फायदा होईल. कच्च्या उमेदवाराला दुसरा पक्ष आपल्या ताकदीने विजयी करू शकतो.
-साहेबराव पाटील, माजी आमदार, अमळनेर.
ज्याला समाजाची, विकासाची आवड आहे असेच लोक निवडले जातील. हौशानवशांना यात संधी मिळणार नाही. - प्रवीण पाठक, विरोधी पक्षनेता, अमळनेर नगरपरिषद.