ट्रक उलटून दोन ठार, 11 जखमी
By Admin | Updated: March 21, 2017 00:17 IST2017-03-21T00:17:29+5:302017-03-21T00:17:29+5:30
जामदा रेल्वेगेटजवळील अपघात : कपाशी भरलेल्या ट्रकखाली मजूर दाबले गेले

ट्रक उलटून दोन ठार, 11 जखमी
मेहुणबारे, ता. चाळीसगाव : कपाशीने भरलेला 14 चाकी ट्रक एका वळणावर झाडाला धडक देऊन उलटल्याने दोन जण जागीच ठार, तर 11 मजूर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता जामदा रेल्वे गेटजवळील वळणावर घडली.
अजरुन अलम राठोड (35) व प्रवीण जाधव (18, दोघे रा. चिंचगव्हाण तांडा, ता. चाळीसगाव) अशी या मृतांची नावे आहेत.
ट्रक (क्रमांक एमएच-18-बीए-5057) दस्केबर्डी येथून कपाशी भरून मेहुणबारेकडे जात होता. जामदा रेल्वे गेटजवळील वळणावर येताच हा ट्रक झाडाला धडकून उलटला. ट्रकमध्ये एकूण 13 मजूर बसले होते. यापैकी अजरुन राठोड व प्रवीण जाधव हे जागीच ठार झाले. उर्वरित 11 मजूरही कपाशीखाली दाबले गेले. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असून मजुरांना उपचारासाठी मेहुणबारे व चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींमध्ये बारकू चना चव्हाण (26), सुरेश बाबूलाल चव्हाण (25), नीलेश मंगतू चव्हाण (22), राकेश भाईदास राठोड (21), सचिन प्रकाश जाधव (20), रवींद्र मोहन राठोड (17), योगेश काशिनाथ जाधव (20), समाधान देवीदास सोनवणे (27), बापू सुपडू राठोड (20), नंदू सुपडू जाधव (29), परमेश्वर जाधव (25, सर्व रा.चिंचगव्हाण तांडा) यांचा समावेश आहे.
गावकरी मदतीला धावले
ट्रक उलटल्याचे समजताच भऊर व जामदा येथील गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली. कपाशीखाली दाबलेल्या मजुरांना बाहेर काढले.
मेहुणबारे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देवरे हेही घटनास्थळी दाखल झाले. व्यापारी बाळकृष्ण वाणी यांनी कपाशीची खरेदी केली होती. अपघात होताच ट्रकचालकाने तेथून पळ काढला.
चिंचगव्हाण तांडय़ावर शोककळा
चिंचगव्हाण तांडय़ात अपघाताचे वृत्त कळताच शोककळा पसरली. मृत व जखमी झालेले मजूर या गावातील असल्याने ग्रामस्थही घटनास्थळी पोहोचले होते. (वार्ताहर)