दोन नायक, एक गायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:32+5:302021-07-31T04:17:32+5:30
लेखक - चंद्रकांत भंडारी शनिवारी सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचा ४१ वा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने देव आनंद ...

दोन नायक, एक गायक
लेखक - चंद्रकांत भंडारी
शनिवारी सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचा ४१ वा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने देव आनंद व शम्मी कपूर या दोन नायकांना रफींबद्दल नेमकं काय वाटत होतं ते त्यांच्याच शब्दांत. मी फक्त निमित्त मात्र ... मुलाखतीच्या निमित्ताने!
मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया! रफींनी देव आनंदसाठी जेव्हा वरील गीत हम दोनो सिनेमासाठी म्हटलं तेव्हा तेच गीत आपल्या जीवनाचं खरंखुरं मन् फिलाॅसॉफी मांडणारं गीत असेल, हे देव आनंद यांना कळलं होतं. कारण दादरला एका हॉटेलात जेव्हा देव हे काही निमित्ताने आले होते, तेव्हा एका सिनेपत्रकार मित्राबरोबर मी तिथे सहजच म्हणून हजर होतो. नेहमीप्रमाणे स्टायलिश कपडे घातलेल्या देव यांनी छानसं स्मित करीत फक्त दहा मिनिटं.. असं म्हणून मुलाखतीसाठी परवानगी दिली. मित्राने देव आनंद यांच्या नव्या प्रोजेक्टबद्दल विचारलं, त्यांनी उत्तर दिलं. मध्येच त्यांना म्हणालो, मै जिंदगी का साथ निभाता चला गया हे गीत तुमच्या जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. ते तुम्हाला खूप प्रिय आहे..
देव आनंद हसले... म्हणाले, एक प्रोजेक्ट जेव्हा मी हाती घेतो, तेव्हा त्यात मी स्वत:ला झोकून देतो... तो प्रोजेक्ट संपला तरी दुसरा. पण दररोज मी दहा विषयांवर विचार करत त्यावर खूपसं वाचन करत, सिनेमांबद्दलचे आराखडे तयार करत असतो़. मी मागे वळून कधी पाहत नाही... आणि भविष्याची चिंता करत दु:खी होत नाही, म्हणूनच मी हर फ्रिक हो धुएं मे उडाता चला गया हे रफींचं गाणं गुणगुणत पुढे जात असतो. सकारात्मक विचार करत कायम आशावादी राहतो. पत्रकारांना मात्र माझे सिनेमे चालले, पडले याची चिंता मात्र सतत सतावते... त्याला माझा नाइलाज आहे.
भेटीदरम्यान देव आनंद यांनी आपण वर्तमानपत्रांसह दररोज रात्री काय काय वाचतो आणि जे वाचलं ते कसं संग्रही ठेवतो, हे सांगितलं अन् म्हणाले, रफींनी माझ्यासाठी जी शेकडो हिट गीत म्हटली, ती माझ्या हृदयात कोरली गेलीय; पण मै जिंदगी का साथ निभाता चला गया हे पहिल्या नंबरवरचं गाणं !
देव आनंद यांच्याकडून वळतोय शम्मी कपूर यांच्याकडे. रफी गेले तेव्हा शम्मी कपूर मुंबईपासून दूर होते. जेव्हा त्यांना रफी गेल्याचे कळले, तेव्हा ते भावुक होत म्हणाले होते, मी माझा फिल्मी आवाज कायमचा गमावलाय. माझं दुर्दैव मी त्यांचं शेवटंच दर्शनही घेऊ शकत नाहीय.
पुढे एका भेटीत शम्मी कपूर म्हणाले, गाण्यांसाठी संगीतकारांना जेव्हा मी रफींची आग्रही मागणी करायचो, तेव्हा ते गीत किती लोकप्रिय होईल व माझा सिनेमा किती गाजेल याचा मला खरंच अंदाज येत असे. मी तसं बोलूनही दाखवत असे. ज्या ‘याहू’ गाण्यात माझी रफींबरोबर गट्टी जमली, ती पुढे कित्येक वर्षं राजकपूर - मुकेश , राजेश खन्ना - किशोरकुमार याप्रमाणे कायम राहिली. माझी सारी मस्तीभरी गाणी रफींनी ज्या जोशाने गायली, त्याला तोड नाही अन् म्हणूनच मी धुंद होत नाचलो.
बोलता बोलता शम्मी कपूर रफीमय झाले होते. कपूर घराण्याला जो नाचगाण्याचा सेन्स होता, तो या गायकांमुळे कसा पडद्यावर गाजला, हे सांगताना त्यांनी कित्येक गाण्यांचे दाखले दिले अन् ‘तिसरी मंझिल’च एक गाणं म्हणत काही टेप्सही करून दाखवल्या.
देव, शम्मीच्या नजरेतून रफींची वैशिष्ट्ये सांगायची तर ते प्रत्येक गीत दिलसे गात. गाणं श्रवणीय होईल हे पाहत. संगीतकाराने जे गीत शिकवलेय त्यात कुठलाही बदल न करता तंतोतंत गात. गाणं ज्या ढंगाचं त्याच ढंगाचा आवाज ते लावत. उंच स्वरातलं गाणं खूप गात. असं वाटायचं, रफी किती रिलॅक्स मूडमध्ये गात आहेत. नव्या गायक, गायिकांना सांभाळून घेत त्यांना प्रोत्साहन देत. गाण्याचा अर्थ नीट समजावून घेत तळमळीने गात. प्रतिभावान गायक कसा असतो, जगतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रफी. भक्तिरसात सदा डुंबणारं, प्रत्येक क्षण समरसून जगणारं असं एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे मोहम्मद रफी.