मांडळला वाळू चोरीवरून दोन गटांत तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:24+5:302021-06-26T04:13:24+5:30

अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे वाळू चोरीची खबर देतो या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी होऊन सुमारे ११ जण ...

Two groups clash over Mandal sand theft | मांडळला वाळू चोरीवरून दोन गटांत तुफान हाणामारी

मांडळला वाळू चोरीवरून दोन गटांत तुफान हाणामारी

अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे वाळू चोरीची खबर देतो या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी होऊन सुमारे ११ जण जखमी झाले असून, रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांतर्फे मारवड पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मांडळ येथून पांझरा नदीतून मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असून, मिळालेल्या माहितीवरून पोलीस व महसूल विभागातर्फे कारवाई झाल्याने वाळू चोरांमध्ये नाराजी पसरली होती. त्यात एकमेकांवर संशय घेऊन वाळूची माहिती पुरवतो या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्याचे पडसाद झटापटीत होऊन दोन्ही गटांतर्फे जमाव जमा होऊन एकमेकांना लाकडी दांडके, तसेच इतर साहित्याने मारहाण करण्यात आली. नदीपात्रात, तसेच गावातदेखील हाणामाऱ्या झाल्या. त्यात काहींचे डोके फुटले, तर काहींच्या पायावर वार करण्यात आले. काहींना हाताला लागले होते. काही जखमी मांडळ येथील दवाखान्यात उपचारासाठी गेले असता संतप्त जमावाने दोन खाजगी दवाखान्यांचीदेखील मोडतोड केली आहे.

घटनेचे वृत्त कळताच प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी तलाठी तिलेश पवार, प्रकाश महाजन, प्रदीप भदाणे, सचिन बमनाथ, सतीश शिंदे यांना पांझरा नदीपात्रात पाठविले तोपर्यंत वाळू चोर ट्रॅक्टर घेऊन पळाले होते, तर सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला, हेडकॉन्स्टेबल विजय होळकर, संभाजी पाटील, मनोज पाटील, राहुल चौधरी यांनी गावात जाऊन शांतता प्रस्थापित केली. पोलीस आल्यानंतर जमाव पांगला होता. सागर अशोक कोळी, पंकज संजय कोळी, विशाल अशोक शिरसाठ, संजय ढोमन कोळी, योगेश हिलाल कोळी, गोकुळ बाबू शिरसाठ, ज्ञानेश्वर प्रकाश कोळी, राकेश वसंत कोळी, अमोल सखाराम कोळी, मका ढोमण कोळी हे ११ जण जखमी झाले असून, त्यातील तीन जणांच्या डोक्याला गंभीर जखमा, तर काहींच्या पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

दोन्ही गटांतर्फे रात्री उशिरापर्यंत मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस उपनिरीक्षक संदीप पेठकर, प्रकाश साळुंखे, संजय पाटील, सुनील आगवणे, सुनील तेली, विशाल चव्हाण यांच्या पथकाला मांडळ गावात पेट्रोलिंग लावून रात्री आरोपींची धरपकड सुरू होती. घटनेमुळे गावात घबराट निर्माण झाली होती. वाळू चोरांच्या मुजोरीमुळे कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Two groups clash over Mandal sand theft