आजपासून बारावी पुरवणी परीक्षेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:24+5:302021-09-16T04:21:24+5:30

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर, तर दहावीची पुरवणी ...

Twelfth supplementary examination starts from today | आजपासून बारावी पुरवणी परीक्षेला सुरूवात

आजपासून बारावी पुरवणी परीक्षेला सुरूवात

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर, तर दहावीची पुरवणी परीक्षा ही २१ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान, या परीक्षा कालावधीत विद्यार्थी अभ्यासाचा ताण आणि परीक्षेच्या भीतीमुळे दडपणाखाली येऊन नकारात्मक विचार करतात व कधी- कधी टोकाची भूमिका घेतात, अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व निकोप वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, म्हणून नाशिक विभागीय मंडळांकडून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी दिली.

इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होणार आहेत. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा घेतली जाणार असून, दहावीची लेखी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होईल. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होईल. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या ताणतणाव विषयक समस्यांचे व शंकांचे निरसन करण्यासाठी व अनिष्ट घटना टाळण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सुविधा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी असेल.

...असे आहेत समुपदेशक

नाशिक जिल्ह्यासाठी किरण बावा, धुळे जिल्ह्यासाठी नंदकिशोर उद्धवराव बागूल, जळगाव जिल्ह्यासाठी बापू माधव साळुंखे यांची, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी राजेंद्र माळी यांची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुरवणी परीक्षेसाठी भरारी पथकांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे.

परीक्षार्थी संख्या अशी...

बारावीची पुरवणी परीक्षा ही जिल्ह्यातील आठ केंद्रांवर होणार आहे. त्यात हाजी नूर म. चाचा ज्यु. महाविद्यालय (जळगाव), पी.ओ. नाहाटा महाविद्यालय (भुसावळ), कोतकर महाविद्यालय (चाळीसगाव), धनाजी नाना महाविद्यालय (एरंडोल), शेठ मु.मा. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (पाचोरा), कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय (चोपडा), किसान महाविद्यालय (पारोळा) या केंद्रांचा समावेश आहे. १४३ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहे, तसेच दहावीची पुरवणी परीक्षा ही तेरा केंद्रांवर होईल, तर १०२ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.

Web Title: Twelfth supplementary examination starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.