उसनवारीचे पैसे वसुलीसाठी घेतलेला ट्रकच केला गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:06+5:302021-07-15T04:13:06+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास सोनू चव्हाण (वय ४०, रा. देव्हारी, ता. जळगाव) या तरुणाने २०१९ मध्ये सहा लाख रुपयांचा ...

The truck used for recovery of loan money disappeared | उसनवारीचे पैसे वसुलीसाठी घेतलेला ट्रकच केला गायब

उसनवारीचे पैसे वसुलीसाठी घेतलेला ट्रकच केला गायब

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास सोनू चव्हाण (वय ४०, रा. देव्हारी, ता. जळगाव) या तरुणाने २०१९ मध्ये सहा लाख रुपयांचा ट्रक (क्र. एमएच-१८ एए-१७४९) फायनान्स कंपनीकडून घेतला. गुरांच्या बाजार येथे ट्रकचा वापर करून भाडे करीत असताना दुसऱ्या ट्रकचा चालक नीलेश परदेशी या तरुणाशी कैलास याची ओळख झाली. पैशाची गरज भासल्याने ओळखीमुळे कैलास याने नीलेशकडून २० हजार रुपये उसनवारीने घेतले. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये एमआयडीसीत नीलेश याने कैलासकडे घेतलेले २० हजार रुपये परत मागितले. लॉकडाऊन असल्याने अडचण आहे, नंतर करून देईन, असे कैलास याने सांगितले असता मलाही सध्या काम नाही. दोन महिन्यांसाठी तुझा ट्रक मला दे, मी त्यावर भाडे करतो. त्यात तू घेतलेले २० हजार रुपये कमवून घेतो व तुला तुझा ट्रक परत करतो, असे सांगून तो ट्रक घेऊन गेला. त्या दिवसापासून नीलेशचा संपर्कच बंद झाला. कैलास याने त्याच्या गावाला जाऊन शोध घेतला असता तो तेथेही नव्हता. अशातच ७ जुलै रोजी कैलास दुसऱ्या ट्रकमध्ये माल भरून नागपूर येथे गेला असता नीलेश तेथे एका ट्रान्स्पोर्टच्या कार्यालयात भेटला. ट्रकबाबत विचारणा केली असता तो जळगावात असल्याचे सांगितले. त्यानुसार कैलास जळगावात आल्यावर त्याच्याकडे विचारणा केली, तर चोपड्यात असल्याचे सांगितले. तेथे गेल्यावरही ट्रक गायब झालेला होता. नीलेश याने ट्रकची विल्हेवाट लावल्याची खात्री पटल्यानंतर कैलास याने मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

ट्रान्स्पोर्टनगरातून केली अटक

दरम्यान, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद व सचिन पाटील यांचे एक पथक त्याच्या शोधार्थ रवाना केले. तो जळगावातच येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्याला एमआयडीसीतून अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्या. ए.एस. शेख यांनी त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी बाजू मांडली.

Web Title: The truck used for recovery of loan money disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.