भंडाफोड : भुसावळच्या चालकाला अटक
जळगाव / अकोला : जळगाव एस. के. ऑईल मिल येथून तेलाने भरलेला ट्रक रायपूरला जात असताना २२ लाख रुपये किमतीचे तेल ट्रकचालकाने इंदूरला परस्पर विकून दरोड्याचा बनाव केला, मात्र अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता ट्रकचालकाचा बनाव उघड झाला. पोलिसांनी रोशन होलाराम सचदेव (वय ३५,रा. भुसावळ) याला अटक केली आहे.
भुसावळ येथील रोशन होलाराम हा ट्रकचालक ४ सप्टेंबर रोजी एस. के. ऑईल मिल जळगाव येथून २२ लाख रुपये किमतीचे सूर्यफूल तेल रायपूर येथे घेऊन जात होता. मात्र, चालक रोशन याची नियत बदलल्याने त्याने तेलाचा ट्रक परस्पर इंदूर येथे नेला. तेथे तेलाची विक्री केली व ट्रक मालेगाव येथे औरंगाबाद रोडवर उभा करून थेट बोरगाव मंजू पोलीस ठाणे गाठले व लुटल्याचा बनाव केला. त्यानेच स्वत: पोलीस ठाण्यात रिपोर्ट दिला की, तो हायवेवर नैसर्गिक विधीकरिता थांबला होता. यावेळी एका वाहनातून आलेल्या पाच जणांनी त्याला पकडले. त्यापैकी दोघांनी तीन दिवस डांबून ठेवले. तर दोघे ट्रक घेऊन पळाले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व बोरगाव मंजूचे पोलीस संयुक्त तपास करीत असताना त्यांना घटना संशयास्पद वाटली. त्यांनी चालकाची सखोल चौकशी केली असता चालकाने ट्रक मालकासोबत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर एसके ऑईल मिलचे प्रदीप बन्सीलाल लाहोटी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.