महामार्गावर ट्रकची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2017 00:30 IST2017-04-17T00:30:41+5:302017-04-17T00:30:41+5:30

चालकाला मारहाण : कट मारुन ओव्हरटेक

Truck breakdown on the highway | महामार्गावर ट्रकची तोडफोड

महामार्गावर ट्रकची तोडफोड

जळगाव : ट्रकला कट मारुन पुढे गेलेल्या दुचाकीस्वाराने आपल्याकडे  पाहून इशारा केल्याच्या संशयावरुन ट्रकच्या काचा फोडून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर मानराज पार्कजवळ घडली. या घटनेत दुचाकीस्वार फरार झाला असून ट्रक रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जखमी ट्रक चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वरणगाव येथील चालक मुस्तफा खान जहांगीर खान (वय २५ ) हा तरुण ट्रक (क्र.एम.एच.१८ एम.३७२३) घेऊन वरणगाव येथून बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत माल भरण्यासाठी जात असताना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महामार्गावर मानराज पार्कजवळ समोरुन दुचाकीवर दोन जण आले. दोन्ही बाजूंच्या वाहनातून मार्ग काढून दुचाकीस्वार पुढे गेला.  यावेळी  कट लागला असता दुचाकीस्वाराने मागे फिरुन ट्रक चालकाला इशारा केला. त्यावर मुस्तफा खान यानेही बाहेर हात काढून दुचाकीस्वाराला इशारा केला. आपल्याला वाईट हेतून इशारा केल्याच्या संशयावरुन दुचाकीस्वार मागे फिरुन आला. मानराज चौकात थांबलेल्या दहा ते बारा जणांना बोलावून घेत ट्रकवर हल्ला केला. दोन्ही बाजुचे काच फोडून चालकाला खाली खेचले व बेदम मारहाण करायला सुरुवात केली.चालक जखमी होऊन ट्रकचे नुकसान झाल्याने पोलीस येण्याच्या आत मारहाण करणारे घटनास्थळावरुन पसार झाले होते. चालकाला दुचाकीचा क्रमांकही सांगता येत नाही व वर्णनही व्यवस्थित सांगता येत नाही, त्यामुळे त्यांचा शोध घेणे जिकरीचे झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर चालकाचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.


ट्रक जाळण्याचा प्रयत्न
ट्रक चालकाला मारहाण होत असताना काही जण ट्रकची तोडफोड करीत होते तर काही जण ट्रक जाळण्याची भाषा करीत होते. त्यासाठी डिझेल टाकी फोडण्याचा प्रयत्न झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ व रामानंद नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने ट्रक पेटविण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान, यावेळी महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी ट्रक रामानंद नगर पोलिसात नेला. त्यानंतर चालकाला जिल्हा रुग्णालयात हलविले.

Web Title: Truck breakdown on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.