महामार्गावर पुन्हा दुचाकीस्वाराला ट्रकने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:57+5:302021-07-15T04:12:57+5:30
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कडू धनगर हे ट्रक चालक म्हणून खासगी नोकरी करतात. ट्रक नादुरस्त झाल्याने त्याचे स्पेअरपार्ट घेण्यासाठी बुधवारी ...

महामार्गावर पुन्हा दुचाकीस्वाराला ट्रकने उडविले
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कडू धनगर हे ट्रक चालक म्हणून खासगी नोकरी करतात. ट्रक नादुरस्त झाल्याने त्याचे स्पेअरपार्ट घेण्यासाठी बुधवारी ते दीपक कुंभार याला घेऊन दुचाकीने जळगावला येत होते. जैन कंपनीजवळ मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने धनगर यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपक याचा हात व पाय फ्रॅक्चर झाला आहे. दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. धनगर यांना मृत घोषित करण्यात आले तर दीपक याला प्राथमिक उपचार करुन खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. धडक देणारे वाहन जागेवर न थांबता चालक वाहनासह पसार झाला. धनगर यांच्या पश्चात पत्नी संगीता व मुलगा सुखदेव असा परिवार आहे. मुलगा देखील वाहन चालक आहे.
सात दिवसात दहा जण ठार
महामार्ग तसेच शहर व परिसरात गेल्या आठवड्यापासून अपघातांची मालिका सुरु झाली आहे. सात दिवसात रस्ता अपघातात शहर व परिसरात दहा जण ठार झाले आहेत. नशिराबादनजीक ८ जुलै रोजी झालेल्या अपघातात अभिजीत पसारे व पवन बागुल हे दोन तरुण ठार झाले होते. त्यानंतर दहा जुलै रोजी वेलेजवळ झालेल्या अपघातात हर्षल पाटील व नितीन भिल हे दोन तरुण ठार झाले होते. ११ जुलै रोजी नशिराबादजवळ एक जण ठार झाला. १२ जुलै रोजी पाळधी, ता.जामनेरजवळ पंकज तावडे, धनंजय सपकाळे व प्रवीण पाटील हे तीन जण ठार झाले. १३ रोजी शिरसोली-रामदेववाडी रस्त्यावर लालसिंग चव्हाण हा तरुण ठार झाला तर १४ रोजी बांभोरीजवळ कडू धनगर हे दुचाकीस्वार ठार झाले. आठवडाभरापासून रोज अपघात होत असून त्यात वाहनचालकांचा जीव जात आहे.