घरातून उचलून नेत केला आदिवासी बालिकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 20:00 IST2020-06-25T19:59:57+5:302020-06-25T20:00:38+5:30
किनगाव येथील घटना : आरोपीस केली पोलिसांनी अटक

घरातून उचलून नेत केला आदिवासी बालिकेचा विनयभंग
यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील नऊ वर्षीय आदिवासी बालिकेस आरोपी गुलाब उर्फ फिरोज उर्फ फिऱ्या सलीम मन्यार याने २४ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घरातून उचलून नेत तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी सदर बालिकेच्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात अॅट्रॉसीटीसह बाललैंगीक अत्याचार प्रतीबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी लगेचच अटक केली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील चुंचाळे रस्त्यावरील रहिवासास असलेल्या एका आदिवासी कुटूंबियातील नऊ वर्षीय बालिका ही तिचे वडील विहिर खोदावयास कामानिमित्त गेल्याने ती रात्री किनगावी आत्याच्या घरी झोपण्यास गेली होती.
यादरम्यान गावातील गुलाब मन्यार याने २४ जूनच्या पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास या बालिकेच्या आत्याच्या घरात घुसून बालिकेचे तोंड दाबून तिला उचलून घराबाहेर नेले.
या बालिकेने आपल्या बचावासाठी आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडा-ओरड केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देवून आरोपीने तिच्याशी अंगलट करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
याप्रकरणी पिडीत बालिकेने येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, हे.कॉ. संजय तायडे करीत आहेत. पोलीस या आरोपीकडून माहिती घेत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत आरोपीचा निषेध केला जात असून त्याला कडक शासन व्हावे, अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.