आरटीओ कार्यालयात दक्षता पथकाकडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:07+5:302021-09-22T04:20:07+5:30
जळगाव : मुंबई येथील दक्षता पथकाकडून मंगळवारी आरटीओ कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. सकाळी ११.१५ ते दुपारी दीड व त्यानंतर ...

आरटीओ कार्यालयात दक्षता पथकाकडून झाडाझडती
जळगाव : मुंबई येथील दक्षता पथकाकडून मंगळवारी आरटीओ कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. सकाळी ११.१५ ते दुपारी दीड व त्यानंतर पुन्हा सायंकाळी अशी दोन टप्प्यांत पथकाकडून कार्यालयातील दप्तर तपासणी करण्यात आली. आर्थिक अनियमितता व शासनाच्या महसुलाचे नुकसान याबाबत झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हे पथक आले होते.
जळगाव आरटीओ कार्यालयात काहीजणांकडून शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले आहे, याबाबत परिवहन आयुक्तांकडे तक्रार झालेली होती. या तक्रारीची दखल घेत परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दक्षता पथकाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त अविनाश सावंत यांच्या नेतृत्वात तीनजणांचे पथक मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता आरटीओत दाखल झाले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांची भेट घेऊन, तक्रारीचा तपशील सांगून कार्यालयातील काही दस्तऐवज तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत सूचित केले. या पथकाने दोन टप्प्यांत आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, संगणकातील डाटा तपासला. काहीजणांची चौकशी केली. या दरम्यान, बाहेरील एकाही व्यक्तीला आत प्रवेश दिला जात नव्हता. चौकशीनंतर हे पथक रवाना झाले. येत्या काही दिवसांत पथक पुन्हा येणार असून अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदविणार आहे. त्यानंतर अहवाल परिवहन आयुक्तांकडे सादर केला जाईल. या वृत्तास श्याम लोही यांनी दुजोरा दिला आहे.