आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१ : लक्ष्यवेधी आणि सर्वसामान्यांच्या लक्षात राहणारी कृती करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जामनेर नगरपालिकेसाठी बुलेटवरून शहराचा फेरफटका मारत प्रचार केला. ‘बुलेटराजा’ असलेल्या गिरीश महाजनांकडून विना नंबरच्या व विना हेल्मेट बुलेटचा वापर करीत वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.जलसंपदामंत्री गिरीश महाजन शुक्रवारी जामनेरला आल्यानंतर त्यांनी स्थानिक कार्यकर्ते व उमेदवारांकडून जामनेर नगरपालिका निवडणूक प्रचाराची माहिती घेतली. रात्री निवडक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. शनिवारी कार्यकर्त्यासोबत बुलेटवरुन प्रभागात जावून मतदारांशी संपर्क साधला. या दरम्यान मंत्र्यांनी वापरलेली बुलेट ही विनानंबरची होती. तसेच बुलेटवरून प्रचार करीत असताना त्यांनी हेल्मेटचा वापर टाळत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे.यापूर्वी दारूच्या बॉटलला महिलांची नावे देण्याचा अनाहूत सल्ला त्यांनी एका कार्यक्रमात दिला होता. त्यानंतर चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर जलसंपदा मंत्र्यांनी हातात पिस्तूल घेत त्या बिबट्याचा शोध घेतला होता. तर जळगावातील एका शाळेच्या कार्यक्रमात त्यांनी कमरेला पिस्तूल लावून विद्यार्थ्यांसमोर भाषण ठोकले होते. या घटनाक्रमानंतर वाहतूक नियमांचा भंग करीत बुलेटवरून प्रचार केल्याची जामनेर शहरात संपूर्ण दिवसभर चर्चा होती.
‘बुलेटराजा’ गिरीश महाजनांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 19:05 IST
विनानंबर बुलेट व विना हेल्मेट घालून केला जामनेरात नगरपालिका निवडणुकीचा प्रचार
‘बुलेटराजा’ गिरीश महाजनांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली
ठळक मुद्देनिवडणूक प्रचारासाठी विनानंबर प्लेटच्या बुलेटचा केला वापरविना हेल्मेट बुलेट चालवित केले वाहतूक नियमाचे उल्लंघनजामनेर नगरपालिकेत भाजपा विरूद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत काट्याची लढत