Transforming Baraypada: Chaitaram Pawar | बारीपाड्याचा कायापालट करणारा किमयागार : चैत्राम पवार
बारीपाड्याचा कायापालट करणारा किमयागार : चैत्राम पवार

सातपुडा व सह्याद्रीच्या मधोमध वसलेला बारीपाडा नावाचा छोटासा वनवासी पाडा; पण चैत्राम पवार या किमयागाराने २७ वर्षांची मेहनत घेऊन या पाड्याचा कायापालट केलाय आणि बारीपाड्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविलंय. सात-सहा वर्षांपासून चैत्राम पवार यांच्याविषयी ऐकत्येय; पण भेटीचा योग जुळून येत नव्हता. अचानक तो आला.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेला बारीपाडा हा अतिशय दुर्गम पाडा. पिंपळनेरनंतर अनेक फाटे पार करीत विचारत विचारत आम्ही बारीपाड्याला पोहोचलो. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले गाव; पण प्रसिद्धीपासून अलिप्त याचे आश्चर्य वाटले. बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहीत नव्हते; परंतु चैत्राम पवार यांच्याविषयी बोलताना या गोष्टींचा उलगडा झाला.
तरुण वयात संघाशी संबंध आला. त्यातून पाड्याचा विकास हेच ध्येय त्यांनी ठेवले. एम.कॉम. ही पदवी घेतली; परंतु आपल्या बांधवांनी प्रगती करावी, ही मनस्वी इच्छा बाळगली. मग साकारले बारीपाड्यातील विविध उपक्रम.
वनवासी संस्कृतीची जपवणूक व संवर्धन
बारीपाडा व आजूबाजूच्या सर्व पाड्यांवर पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. पिकांना कोणतेही रासायनिक खत देण्यात येत नाही. वृक्षांचा आदर करणारी वनवासींची संस्कृती आजही तेथे जपली जात आहे. अगदी प्रदूषण होते म्हणून गावात चैत्रामजींनी बससेवा नाकारली. पाड्यावर दोनच रिक्षा दळणवळणाचे काम करतात. एरव्ही लोक पायीच जातात. फोन नाही, मोबाइल टॉवर नाही. पशु-पक्ष्यांना मुक्तपणे व स्वच्छ वातावरण मिळावे ही चैत्रामजींची इच्छा. अगदी त्यांच्या घराच्या परिसरात ठिकठिकाणी रिकामे डबे, मोठे पाईप उंचावर बांधून ठेवलेय, चिमण्यांना घरटे म्हणून. शहरात नष्ट झालेली चिमणी-चिमणा शेकडोंच्या संख्येने तिथे आम्ही पाहिलेत.
चैत्रामजी सांगतात, या जमिनीला निसर्गाचा आशीर्वाद आहे. इथे कोणतेही बी टाका, ते बहरतेच. याची प्रचिती म्हणजे फणस, सफरचंद यासारखी फळेसुद्धा येतायेत. वनवासी बांधव आपल्या गरजेपुरतेच कमावतात व धान्य साठवितात. त्यातीलच काही भाग बियाणे म्हणून वापरतात. त्यांना कधीच बाहेरून बियाणे आणण्याची गरज पडत नाही. तांदळाचा इंद्रायणी हा प्रकार विकसित केला. लवकरच तो प्रसिद्ध झाला. आज हजारो टन इंद्रायणी तांदूळ विक्री होत आहे. सोलर ड्रायरच्या माध्यमातून मोड आलेली मटकी, पालेभाज्या, कांदा कोरडा केला जातो. याची विक्री करण्याची योजना आहे.
जंगलाची निर्मिती
उजाड माळरानावर चैत्रामजींच्या २७ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे ११०० हेक्टर जंगल पसरले आहे. हे जंगल इतके दाट आहे की, जमिनीपर्यंत सूर्यप्रकाशदेखील पोहोचत नाही. आज चारशेवर विविध पक्ष्यांच्या जाती येथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या वातावरणात स्ट्रॉबेरी व मशरूमचे पीक त्यांनी घेतले आहे. सध्या सफरचंदाची लागवड केली आहे.
वनभाजी महोत्सव
बारीपाड्याला खरी ओळख मिळाली, ती वनभाजी महोत्सव या अनोख्या स्पर्धेमुळे. २००४ पासून ही स्पर्धा चैत्रामजी घेत आहेत. पौष्टिक व दुर्मीळ अशा वनभाज्यांची ओळख जगाला करून देण्याचा हा उपक्रम आहे. साध्या पद्धतीने बनविलेल्या वनभाज्या पाड्यावरील महिलांनी करून आणायच्या व त्याचे औषधी गुणधर्म, कोणत्या रोगांवर किंवा दुखण्यावर त्या लाभदायक ठरू शकतात, याची माहिती द्यायची, अशी ही अनोखी स्पर्धा. जैवविविधता व आरोग्याच्या दृष्टीने या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आज प्राप्त झाले आहे. हजारो लोक या स्पर्धेच्या निमित्ताने बारीपाड्याला भेट देतात. गेल्या वर्षी विजेत्या महिलेने १५० भाज्या तयार केल्या होत्या व त्याचे आयुर्वेदिक महत्त्वही विशद केले होते. अशा प्रोत्साहनपर उपक्रम चैत्रामजी राबवत आहेत.
चैत्रामजींच्या या अथक प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना व बारीपाड्याला अनेक पुरस्कार व सन्मान मिळालेत. जर्मनी व कॅनडा येथील संशोधकांनी बारीपाड्यावर पीएच.डी. केलीय. २०१४ ला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम समितीने येथे भेट दिली. देशभरातून अनेक विद्यापीठांचे विद्यार्थी गट येथे पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी येतात. जंगल, जमीन, जल, जन व जनावर या पाच मुद्यांवर चैत्रामजी काम करीत आहेत. जैवविविधता जपणे, जंगल संस्कृतीची राखण करण्याचे महत्त्वाचे काम ते करीत आहेत.
हे करीत असताना आपण काही तरी वेगळे करीत आहोत, असा अभिनिवेश त्यांचा नाही. केंद्रीय पर्यावरण समितीमध्ये त्यांची निवड झालीय. अत्यंत साधी राहणारी. घरी येणाºया प्रत्येकाचे योग्य आदरातिथ्य, आपुलकीची वागणूक याची प्रचिती आम्ही घेतली. त्यांचा पीए नाही की असिस्टंट. विमल वहिनींची समर्थ साथ त्यांना मिळाली आहे. आपण जगावेगळे काम करीत आहोत, याचा लवलेशही या दाम्पत्यामध्ये नाही. हे बघून आपण नतमस्तक होतो. आपण हजारो, लाखो रुपये खर्च करून तीर्थक्षेत्रांना जातो. माझ्या मते बारीपाड्यासारख्या तीर्थक्षेत्रांना आपण भेटी दिल्या पाहिजेत.
डॉ.मंजूषा पवनीकर, जळगाव


Web Title: Transforming Baraypada: Chaitaram Pawar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.