बदली, निवृत्त झालेले अधिकारी आजही जिल्ह्यात कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:42+5:302021-02-05T05:56:42+5:30
जळगाव : जळगावातून बदली झालेल्या अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांच्यासह सेवानिवृत्त झालेले ...

बदली, निवृत्त झालेले अधिकारी आजही जिल्ह्यात कार्यरत
जळगाव : जळगावातून बदली झालेल्या अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांच्यासह सेवानिवृत्त झालेले एमआयडीसीचे तत्कालिन निरीक्षक विनायक लोकरे, शहरचे अरुण निकम यांच्यासह अनेक प्रभारी अधिकारी आजही त्या-त्या पदावर कार्यरत असल्याचे पोलीस दलाकडूनच दाखविले जात आहे.
तंत्रज्ञानाच्या जोरावर कात टाकणाऱ्या पोलीस दल स्वत:ची वेबसाईट अद्ययावत करण्यास विसरले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचीच फक्त माहिती अद्ययावत करण्यात आली आहे.
पोलीस दलाने चांगली कामगिरी केली की त्याबाबतच्या वृत्तपत्रातील बातम्या, स्वत: काढलेल्या प्रेस नोट याची माहिती मात्र न चुकता रोज अपलोड केली जाते, बातम्या ट्विट केल्या जातात, मात्र अतिशय महत्त्वाची असलेली जिल्हा पोलीस दलाची प्रशासकीय माहिती अद्ययावत करणे टाळले जात आहे की, त्याचा विसरच पडला आहे.
जिल्ह्यात दाखल गुन्हे, उघड गुन्हे व प्रलंबित गुन्हे ही माहिती देखील दर महिन्याला अपडेट होणे गरजेचे आहे, त्याबाबत पोलीस महासंचालकांकडूनच सक्त सूचना आहेत, मात्र स्थानिक यंत्रणेने या सूचना कधीच केराच्या टोपलीत टाकल्या आहेत. ना अधिकाऱ्यांची माहिती अद्ययावत केली आहे, ना गुन्ह्यांची माहिती. पोलीस अधीक्षकांनीही याकडे कधी लक्ष दिलेले नाही, म्हणूनच की काय यंत्रणेचा याकडे कानाडोळा होत आहे.
बदललेले प्रभारी अधिकारी कायम
जिल्हा पोलीस दलाच्या वेबसाईटवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचा फोटो आहे तर अपर पोलीस अधीक्षक म्हणून भाग्यश्री नवटके, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून डॉ. नीलाभ रोहन, भुसावळचे उपविभागीय अधिकारी म्हणून गजानन राठोड कायम असून एमआयडीसीचे निरीक्षक विनायक लोकरे यांची पदोन्नतीने बदली झाली, त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले, तरीही त्यांचे नाव कायम आहे. शहर पोलीस स्टेशनचे अरुण निकम हे देखील निवृत्त झालेले असताना ते आजही शहराचे निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. जिल्हापेठचे अकबर पटेल यांची धुळ्यात बदली झाली असली तरी ते आजही कायम आहेत. त्याशिवाय नशिराबाद येथील प्रवीण साळुंखे, मेहुणबारे येथील सचिन बेंद्रे, निंभोरा येथे महेश जानकर, बोदवडला बळीराम हिरे, सावदा येथे राहुल वाघ, यावल अरुण धनवडे, पाचोरा उपविभागीय अधिकारी ईश्वर काकडे हे आजही कार्यरत असल्याचे दाखविण्यात आले आहे.