सुरत रेल्वेगेटवर पुन्हा वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:35+5:302021-02-05T06:01:35+5:30
जळगाव - शहरातील सुरत रेल्वेगेटवर मंगळवारी पुन्हा वाहतूककोंडी झाल्यामुळे तब्बल दीड तास वाहतुक खोळंबली होती. या गेटवर आता ...

सुरत रेल्वेगेटवर पुन्हा वाहतूककोंडी
जळगाव - शहरातील सुरत रेल्वेगेटवर मंगळवारी पुन्हा वाहतूककोंडी झाल्यामुळे तब्बल दीड तास वाहतुक खोळंबली होती. या गेटवर आता वाहतुककोंडीची समस्या कायम निर्माण होत असल्याने आता नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम त्वरित पुर्ण करण्याची मागणी केली जात आहे. तब्बल दोन वर्षांपासून या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. सुरत रेल्वेगेटवर वाहतूककोंडीची समस्या आता नित्याचीच झाली आहे.
फुले मार्केटमधील हॉकर्सचे ओटे तोडले
जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून मंगळवारी सायंकाळी फुले मार्केटमध्ये हॉकर्सने व्यवसायासाठी तयार केलेले सर्व ओटे तोडण्यात आले. यावेळी पोलीसांचा तगडा बंदोबस्त देखील याठिकाणी पहायला मिळाला. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे स्वत: कारवाईदरम्यान उपस्थित होते. यासह नवीन बसस्थानक भागातील सर्व अतिक्रमणांवर देखील मनपाच्या पथकाने कारवाई करत, माल जप्त केला. यासह बळीराम पेठ भागात देखील मनपाकडून कारवाई करण्यात आली.
कुत्रे निर्बीजीकरणाचा मक्ता रद्द
जळगाव - शहरातील मोकाट कुत्र्यांच्या चुकीच्या शस्त्रक्रिया केल्याच्या तक्रारीत अॅनिमल वेल्फेअर बोर्डाने अमरावती येथील लक्ष्मी अॅनिमल वेल्फेअर संस्थेची मान्यता निलंबित केली आहे. त्यामुळे महापालिकेनेही कुत्रे निर्बीजीकरणाचा मक्ता रद्द करण्याचे आदेश बजावले आहेत. मोकाट कुत्र्यांची समस्या तीव्र असल्याने पालिकेकडून नवीन मक्त्यासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.
सफाई कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा
जळगाव - मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन देवून देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी मनपा २२ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर संघाकडून मंगळवारी महापौर भारती सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच या मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.