लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चोपडा, जळगाव व यावल तालुक्यांतून शहराकडे येणाऱ्या शनिपेठ व सुरत रेल्वेगेट या दोन्ही प्रमुख रस्त्यांवर मंगळवारी सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले. सुरत रेल्वेगेटवर सकाळी ११ वाजता, तर शनिपेठ भागातील रस्त्यावर दुपारी १ वाजेच्या सुमारास ही वाहतूक कोंडी झाली. चोपडा व जळगाव तालुक्यांतून शहरात येण्यासाठी हेच दोन मार्ग आहेत. मात्र, या दोन्ही रस्त्यांवर सातत्याने कोंडी होत असल्याने आता शहरात प्रवेश करणेदेखील कठीण झाले आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या नवीन बांधकामासाठी हा पृूल बंद करण्यात आल्यापासून चोपडा, जळगाव व यावल तालुक्यांतून येणाऱ्या वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. आता हा पूल बंद होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही पुलाचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्व वाहतुकीचा भार या दोन्ही रस्त्यावर आहे.
बेशिस्त वाहनधारकांमुळे चक्का जाम
सुरत रेल्वेगेटजवळ एकामागून एक रेल्वे गाड्या गेल्यामुळे रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. गेट उघडल्यानंतर रेल्वे मालधक्क्याकडून, निमखेडी व शिवाजीनगरकडून येणाऱ्या वाहनधारकांनी एकाच वेळी रेल्वेगेट ओलांडण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवाजीनगरकडून येणाऱ्या वाहनधारकांचा मार्ग मालधक्क्याकडून येणाऱ्या वाहनधारकांनी रोखल्यामुळे शिवाजीनगरकडील संपूर्ण वाहतूक पूर्णपणे खोळंबली, त्यातच बेशिस्त रिक्षाचालक व काही मोटारसायकलस्वारांनी विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू केल्यामुळे निमखेडी रस्त्याकडून येणारी वाहतूकदेखील खोळंबली. सुमारे अर्धातास सर्वच वाहने एकाच जागेवर थांबली होती.
वाळूचे डंपर फसल्याने वाहतूक कोंडी
शनिपेठकडून ममुराबाद रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतदेखील मंगळवारी पुन्हा वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी १ वाजता वाळूचे डंपर अमृतच्या कामामुळे खोदलेल्या खड्ड्यात फसले, यामुळे मागील येणारी वाहतूकदेखील खोळंबली. डंपर काढता येत नसल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या. त्यात अनेक अवजड वाहनेदेखील दाखल झाल्याने ही कोंडी आणखीच वाढत गेली.
वाहनधारकांनीच पार पाडली वाहतूक पोलिसांची भूमिका
सुमारे तासभर संपूर्णपणे वाहतूक खोळंबल्यामुळे काही वाहनधारकांनीच आपली वाहने बाजूला उभी करून, स्वत:च वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका वाहतूक पोलिसाने देखील पुढाकार घेत, वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवजड वाहनांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास चांगल्याच अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, दोन्हीही ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, याठिकाणी एकही वाहतूक कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ही कोंडी वाढतच जाते.