संगीत नाटकांची परंपरा असलेले गाव नगरदेवळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 03:20 PM2019-07-06T15:20:19+5:302019-07-06T15:20:38+5:30

धार्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळ्यात अडीचशेवर लोककलावंत होऊन गेले. येथील कला आणि कलावंत यांच्याविषयीच्या लेखमालेतील तिसरा भाग लिहिताहेत साहित्यिक संजीव बावस्कर...

The town of Nagadevala, which has a tradition of musical plays | संगीत नाटकांची परंपरा असलेले गाव नगरदेवळा

संगीत नाटकांची परंपरा असलेले गाव नगरदेवळा

Next

नगरदेवळे (ता.पाचोरा) गावात पूर्वी संगीत नाटकांची परंपरा होती़ चिंधा विरारी हे जुने नाटक कलावंत होते़ त्यांच्यानंतर पुुंडलिक चिंधा बिरारी, परमेश्वर पाटील, जयराम पाटील, राजाराम पाटील, श्यामराव पाटील, बबन पाटील, नाना पाटील, पांडुरंग शिंदे यांनी नाटकांमध्ये विविध भूमिका करूनच प्रेक्षकांची पसंती मिळवली़ आजूबाजुच्या परिसरातून प्रेक्षक नाटक बघण्यासाठी येत असत़ भिका पवार हे ढोलकी वादनात खूप प्रसिद्ध होते़ कुठल्याही प्रकारचे वाघ ते सफाईदारपणे वाजवत़ गाव व परिसरात ते भिका ढोलक या नावानेच अधिक प्रसिद्ध होते़
गावात कै.विश्वनाथ जोशी यांनी कीर्तन परंपरेचा श्रीगणेशा केला. मगन शिंपी, भिला पाटील, रामकृष्ण शिंपी नंतरच्या काळात शंकर पाटील, तुकाराम अण्णा, नामदेव पाटील, पोपट कुंभार, शिवाजी इंगळे, आजच्या पिढीत जयप्रकाश परदेशी, जितेंद्र भांडारकर, प्रमोद परदेशी, सुनील चौधरी, बुधा भोई, ज्ञानेश्वर महाजन यांनी भजनाची परंपरा आपल्या खांद्यावर घेतली़
कै़विठ्ठल मिस्तरी यांनी सलगपणे ३८ वर्षे अखंड प्रभातफेरीद्वारा सांप्रदायिक भजनी परंपरा जिवंत ठेवली़ आज गावात दहापेक्षा अधिक भजनी मंडळे आहेत़ त्यात चार-पाच भजनी मंडळे महिलांची आहेत. हे विशेष़
मराठी भजनांसोबत हिंदी संतांच्या रचनादेखील हे तितक्याच ताकदीने सादर करतात. उल्लेखनीच बाब म्हणजे समाजरत्न तात्यासाहेब दे़दो़ महाजन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गाव व परिसरातील सर्व भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी भजन स्पर्धेचे आयोजनदेखील करण्यात आले होते़ भागवत महाजन या लोककलावंताला संबळ वादनासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते़ इयत्ता चौथीच्या वर्गात असलेल्या योगेश पाटील या बालशाहिराने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेला़ एक छंद म्हणून या केलेची जोपासना या मंडळाकडून केली जाते़
गाव परिसरातील जत्रा असो किंवा आठवडेबाजार तमाशाचा फड ठरलेलाच असायचा. गावात भरवस्तीत किंवा नदीपात्रात तमाशाला कधीच जागा मिळाली नाही. परंतु जीनचे पटांगण ही त्यांची हक्कांची जागा दत्तोबा गुरव हे हरहुन्नरी कलावंत गबूल गोंधळी यांच्यापासून प्रेरणा घेत नथ्थू भोकरे यांच्या तालमीत तयार होऊन त्यांनी स्वतंत्र्य तमाशा फड काढला़ काही काळ त्यांच्या तमाशाने बरीच भरारी मारली़ त्यानंतर रतन भोई नगरदेवळेकर यांनी भजनी मंडळ व कलापथकातून स्वतंत्र तमाशा मंडळाची स्थापना केली़ आज त्यांचा फड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असतो़ झपाट्याने बदलत्या प्रसार माध्यमांमुळे मनोरंजनाची बक्कळ साधने उपलब्ध असताना तमाशा या लोककलेला घरघर लागलेली आहे़ पण तरीदेखील या कलेच्या प्रेमापोटी मिळेल ते मानधन स्वीकारत या मंडळींनी तमाशा जिवंत ठेवला आहे़
आज या तमाशावर गाव व परिसरातील पंधरा ते वीस कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो़
वही गायनाची परंपरादेखील या गावातील लोकांनी श्रद्धेने जोपासली़ पांडुरंग व पुंडलिक महाजन वही गायनात पांडा व पुंडा महाजन म्हणून आजही लोकांच्या मुखी आहेत़ यांच्यापासून वही गायनाचे धठे नवीन पिढीने घेतले़ शंकर इंगळे हेदेखील त्यांचे सहकारी होते़ जगन महाजन, धर्मा न्हावी, रामभाऊ महाजन, सीताराम महाजन, राजेंद्र पाटील, संजय पाटील, विनोदवीर लोटन महाजन यांनी या कलेचा वारसा आपल्याकडे घेतला आहे़ श्रावण व चैत्र महिन्यात या पथकांनी मोठी मागणी असते़ डफ तुणतुणे, ढोलकी, टाळ, संबळ या पारंपरिक वाद्यांसोबत कैसिनो ताशा भांडे ही वाद्येदेखील वाजवली जातात़ त्यामुळे जुन्या चर्मवाघातील नादमाधुर्य आता नष्ट झाले आहे़ आज सीताराम महाजन तुकाराम यांची पथके वहीगायन करतात़ नवीन पिढीतील भैया महाजन, कडू बहिरम यांचे पथकदेखील वहिगायन करते़ वहीगायनात भारूड, भेदीक रचना व लोकगीतांचा पण समावेश असतो़ पुरूष मंडळीच स्त्री पात्र सादर करतात़ पण त्यांचा अभिनय मात्र वाखाणण्याजोगा असतो़ गायन व नृत्य यांच्या मदतीने वहीगायन चालते़ प्रसंगानुरूप मौखिक रचना तिथल्या तिथे सादर करून पे्रक्षकांची वाहवा ते मिळवतात़ त्यावेळी गायकांच्या हजरजबाबीपणाला दाद द्यावी लागते़ (क्रमश:)
-संजीव बावस्कर, नगरदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव

Web Title: The town of Nagadevala, which has a tradition of musical plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.