अमळनेर : शेतात वीज तारांचा शॉक लागल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाल्याची घटना एकरुखी येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यात बालक बालंबाल बचावला आहे.
एकरुखीचे पोलीस पाटील रवींद्र देवराम पाटील यांच्या मालकीची ही बैलजोडी होती. त्यांच्या शेतातून विजेच्या तारा गेल्या आहेत. त्यांचा मुलगा अमोल सकाळी दहा वाजेच्या
सुमारास बैल चारायला शेतात गेला होता. अमोलने बांधावर बैल चरायला सोडले, विजेच्या तारा खाली पडल्या होत्या. परंतु त्या दिसत नसल्याने बैल पुढे सरकले. बैलांना शॉक लागताच बैल जमिनीवर कोसळले. त्याचवेळी अमोललाही शॉक लागला मात्र तो दूर पळून गेल्याने बचावला.
घटनेचे वृत्त कळताच पोलीस पाटील शेतात पोहचले अन् सर्जा-राजाची जोडी पडलेली पाहताच हंबरडा फोडला. पाटील यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. हेकॉ. भरत ईशी, तलाठी स्वप्नील कुलकर्णी, विद्युत अभियंता सावंत यांनी पंचनामा केला.