तोतला, मणियार यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:09+5:302021-06-26T04:13:09+5:30

जळगाव : बीएचआर घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ संशयितांपैकी ९ जणांनी पुणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ...

Totala, Maniyar's interim bail application was rejected | तोतला, मणियार यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

तोतला, मणियार यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

जळगाव : बीएचआर घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ संशयितांपैकी ९ जणांनी पुणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी जयश्री तोतला व जयश्री मणियार या दोघांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला आहे. उर्वरित संशयितांच्या जामिनावर १ जुलैला कामकाज होणार आहे.

पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी २६ नोव्हेंबर रोजी १३५ जणांचे पथक जळगावात दाखल झाले होते. त्याच प्रकरणात पुन्हा पुणे पोलिसांची ५० जणांची दहा पथके १७ जून रोजी जळगावात आली होती. तर पाच पथक औरंगाबाद तसेच मुंबई, अकोला व पुणे येथे पाठविण्यात आली होती. या पथकांनी अकरा संशयितांना अटक केली होती.

यांनी केले जामिनासाठी अर्ज

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या ११ संशयितांपैकी अंबादास मानकापे (रा.औरंगाबाद), जयश्री तोतला (रा.मुंबई), प्रेम कोगटा, भागवत भंगाळे, जयश्री मणियार, संजय तोतला, (रा.जळगाव), छगन झाल्टे, जितेंद्र पाटील (रा.जामनेर), प्रितेश जैन (रा.धुळे) या ९ संशयितांनी जामीन अर्ज दाखल केले होते. दरम्यान, शुक्रवारी जामीन अर्जावर कामकाज होणार नव्हते़ परंतु, आमच्या जामीन अर्जावर आजच सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी जयश्री तोतला व जयश्री मणियार यांचे वकील अ‍ॅड. आर.एफ. तोतला यांनी केली. त्यानुसार या दोघांच्या अंतरिम जामीन अर्जांवर न्यायमूर्ती एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. यावेळी सुनावणी दरम्यान सरकार पक्षाकडून अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी जोरदार युक्तिवाद करीत जामीन फेटाळण्याची मागणी केली. त्यावर न्या. गोसावी यांनी संशयितांवर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याुळे जामीन देता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत अंतरिम जामीन फेटाळून लावला. तसेच आता उर्वरित संशयितांच्या जामिनावर १ जुलै रोजी कामकाज होणार आहे. दुसरीकडे मुख्य सूत्रधार सुनील झंवरचा अनेकदा अटकपूर्व जामीन फेटाळलेला असतानाही त्यांनी पुन्हा एकदा पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतली आहे.

Web Title: Totala, Maniyar's interim bail application was rejected