अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती गेल्या तीन वर्षांपासून बिकट झाली असून, आता शहरातील असा एकही रस्ता नाही की, ज्या रस्त्यावर खड्डे आणि चिखल नाही. आता जळगाव शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर वाहनधारकांचे स्वागत खड्डे व चिखलाने भरलेल्या रस्त्यांनी होत असून, ही परिस्थिती आता केव्हा बदलेल, असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील विविध भागांकडून येणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली. पाहणीदरम्यान, शहरात कोणत्याही मार्गाने प्रवेश करा, वाहनधारकांना खराब रस्त्यांचाच सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता असो वा राज्य शासनाच्या अखत्यारित येणारा रस्ता किंवा मग महापालिकेच्या हद्दीतील रस्ता असो, सर्वच रस्त्यांची स्थिती अतिशय विदारक आहे. जीवघेणे खड्डे, चिखल आणि धुळीचा सामना करूनच जळगावात प्रवेश मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ भाग असो वा उपनगरातील भाग, सर्वच भागातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यात शहरात येणाऱ्या सर्वच प्रमुख रस्त्यांची स्थिती देखील काही वेगळी नाही.
या रस्त्यांची केली पाहणी
१. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शहरात विविध भागांकडून येणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली असता, सर्वच भागांकडून शहरात येणाऱ्या रस्त्यांची स्थिती एकसारखीच असल्याचे आढळून आले.
२. कानळदा, ममुराबाद व आसोदा या भागांकडून शहरात येणाऱ्या तिन्ही रस्त्यांवर चिखल पसरलेला होता. कानळदा रस्त्यालगतची स्थिती ही अनेक वर्षांपासून कायम असून, रस्ता दुरुस्त कोण करणार, असा प्रश्न याठिकाणी अनेक वर्षांपासून कायम आहे.
३. शिरसोली, पाचोऱ्याकडून येणाऱ्या रस्त्यालगतदेखील अमृत अंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम झालेले नाही. गायत्री नगर ते शिरसोली नाका, यादरम्यानच्या रस्त्याची स्थिती तर वाईट आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची काही महिन्यांपूर्वीच दुरुस्ती केली होती.
४. राष्ट्रीय महामार्गावरून बांभोरीकडून येतानाही महामार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून खड्डे चुकविताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. बांभोरी पुलापासून खोटेनगर स्टॉपपर्यंत खड्डेच-खड्डे आहेत.
५. भुसावळकडून येणाऱ्या रस्त्यालगतची परिस्थिती काही वेगळी नाही. डॉ. उल्हास पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढील परिस्थितीही वाहनधारकांची परीक्षा घेणारीच आहे.
मुख्य भागात अमृतची कामे, इतर भागांतील खड्डे कशामुळे?
मनपा प्रशासनाकडून रस्त्यांच्या प्रश्नावर नेहमी अमृतच्या कामांना दोष दिला जात आहे. ज्या भागात अमृत अंतर्गत भुयारी गटार व पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्या रस्त्यांची स्थिती तर खराब आहे. मात्र, अनेक भागात अमृत अंतर्गत कामे झाली नसताना देखील रस्त्यांची स्थिती खराब असल्याचे कारण मात्र मनपाकडून सांगितले जात आहे. मात्र, मनपाकडून प्रत्येक खराब असलेल्या रस्त्याचे खापर अमृत योजनेवर फोडले जात आहे. मनपा प्रशासन याकडे लक्ष देईल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.