शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत टोलवा-टोलवी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST2021-07-20T04:13:06+5:302021-07-20T04:13:06+5:30
विद्युत खांब हटविण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडून राज्य शासनाकडे : छटाकभर कामासाठी दहा महिने वाया : तोडगा नाही; नागरिकांचे ...

शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत टोलवा-टोलवी सुरूच
विद्युत खांब हटविण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडून राज्य शासनाकडे : छटाकभर कामासाठी दहा महिने वाया : तोडगा नाही; नागरिकांचे हाल मात्र कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील ५० हजार नागरिकांसह जळगाव, चोपडा व यावल तालुक्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असून, अजूनही या पुलाचे काम केव्हा होईल? हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. पुलाच्या पुढील कामासाठी अडथळा ठरत असलेले विद्युत खांब हटविण्याचा मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी फेटाळला आहे, तसेच हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवा, अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. या कामात टोलवा-टोलवी सुरू असल्याने हे काम पुन्हा रखडण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे संपूर्ण काम १८ महिन्यात होणे अपेक्षित असताना, आता २६ महिने होऊनदेखील पुलाचे काम अद्यापपर्यंत होऊ शकलेले नाही. पुलाच्या कामाला पुलालगत असलेले महावितरणचे विद्युत खांब मुख्य अडथळा ठरत आहेत. हे विद्युत खांब काढण्याचे काम महावितरणकडे देण्यात आले होते; मात्र महावितरणकडे निधी नसल्याने हे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. शिवाजीनगर उड्डाणपूल हा महापालिकेच्या हद्दीत असल्याने पुलाच्या कामाला होणाऱ्या उशिरामुळे महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्री निधी अंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या २५ कोटी रुपयांच्या शिल्लक दीड कोटी रुपयांच्या निधीतून हे काम करण्याचा निर्णय घेतला.
महावितरणचा भोंगळ कारभार
महावितरणकडून निधीचे कारण देत या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने, मनपाने विद्युत खांब मनपाच्यावतीने काढून घेण्याचा ठराव ३ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या महासभेत मंजूर करून घेतला, तसेच याबाबत मनपाने महावितरणकडून अंदाजपत्रक मागविले. हेच अंदाजपत्रक द्यायला महावितरणने तब्बल दीड महिन्यांचा काळ खर्च केला. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात जाणे अपेक्षित असताना, ठराव झाल्यानंतर ३० एप्रिल रोजी मनपाने विद्युत काम हटवण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला.
डिसेंबरपर्यंत काम होणे अशक्य?
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गेल्या महिन्यात या पुलाच्या कामाची पाहणी केली होती, तसेच हे काम डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याचा सूचना दिल्या होत्या; मात्र विभागीय आयुक्तांनी विद्युत खांबाचा प्रस्ताव नामंजूर करून, राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्यामुळे हे काम पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया करून हे काम मार्गी लावावे लागणार आहे, त्यामुळे डिसेंबरपर्यंत हे काम होणे अशक्यच आहे.
ढिसाळ शासकीय यंत्रणेचा सर्वसामान्यांना फटका
१. शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामात ढिसाळ शासकीय यंत्रणेचा फटका बसत आहे. विद्युत खांब हटविण्याशिवाय हे काम होऊ शकत नाही, हे माहिती असतानाही महावितरणने दुर्लक्ष केले.
२. मनपाने निधीची तरतूद केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अहवाल पाठविण्यास मनपा व महावितरणमुळे तीन महिने उशीर झाला.
३. हे काम मनपा करेल की महावितरण, याचा निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व शहराचे आमदार यांची समिती नेमली होती; मात्र या समितीनेही प्रस्ताव मिळाल्यानंतर निर्णय घेण्यास महिनाभराचा अवधी घेतला.
४. त्रिसदस्यीय समितीने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर विभागीय आयुक्तांनीही तब्बल दीड महिने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी विभागीय आयुक्तांकडे स्मरणपत्रे व संदेश पाठवून या प्रस्तावाकडे लक्ष देण्याची मागणी केली.
५. तब्बल दीड महिन्यानंतर विभागीय आयुक्तांनी या प्रस्तावाकडे पाहिले आणि प्रस्ताव परत करून शासनाकडे पाठविण्याच्या सूचना केल्या. आता पुन्हा हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.