मनपातील सत्तांतराचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:16 IST2021-03-18T04:16:11+5:302021-03-18T04:16:11+5:30
जळगाव : मनपाच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेला सत्तासंघर्ष अधिक रंजक होत चालला आहे. या सत्तांतराचा फैसला ...

मनपातील सत्तांतराचा आज फैसला
जळगाव : मनपाच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेला सत्तासंघर्ष अधिक रंजक होत चालला आहे. या सत्तांतराचा फैसला गुरुवारी होणार आहे. दरम्यान सेना व भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरीही भाजपाचे उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित झालेला नाही. दरम्यान ही सभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घेण्याच्या मागणीसाठी भाजपतर्फे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका न्यायालयाने कोरोना नियमांबाबत शासनाच्या आदेशांमध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगत निकाली काढल्याने भाजपाला झटका बसला आहे.
बुधवारी सकाळी महापौर व उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन व उपमहापौरपदासाठी कुुलभूषण पाटील या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर, दुपारी १ वाजेच्या सुमारास भाजपकडूनदेखील दोन्ही पदांसाठी प्रत्येक दोन-दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. महापौरपदासाठी भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांचे, तर उपमहापौरपदासाठी मयूर कापसे व सुरेश सोनवणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी कोणते उमेदवार निश्चित राहतील याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर सेनेकडून मात्र विजयावर दावा केला जात आहे.
भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण गायब!
महापौरपदाची निवडणूक जवळ आलेली असतानाच भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण गायब झाल्याची तक्रार खुद्द त्यांचे पती बाळासाहेब यशवंतराव चव्हाण (५२, रा. आदर्श नगर) यांनी बुधवारी रामानंद नगर पोलिसात दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपला धक्का, आहेत त्या ठिकाणावरून नगरसेवक करणार मतदान
न्यायालयाच्या निर्णयाने भाजपला सर्वांत मोठा धक्का बसला असून, उरलेला सर्व आशादेखील भाजपच्या मावळल्या असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेला मात्र या निर्णयामुळे फायदा होणार आहे. नगरसेवक आहेत त्या ठिकाणावरून आता मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकणार आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवकदेखील ठाणे येथे रवाना झाले आहेत.