आज आनंदी आनंद झाला.. बियरबार सुरु झाल्याने पारोळ्यात मालकाकडून मोफत जेवणावळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 16:33 IST2017-09-12T16:33:04+5:302017-09-12T16:33:04+5:30
महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील दारू दुकांनांना परवानगी दिल्याने पारोळा येथील बारमालकाकडून मंगळवारी मोफत जेवणावळ

आज आनंदी आनंद झाला.. बियरबार सुरु झाल्याने पारोळ्यात मालकाकडून मोफत जेवणावळ
कुंदन पाटील/ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.12 - महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील दारू दुकाने सुरु करण्यास परवानगी दिल्याच्या आनंदात पारोळा येथील माजी नगरसेवक व बारमालक जितेंद्र पवार यांनी मंगळवारी नियमित ग्राहक व आपले मित्र अशा 300 पेक्षा जास्त जणांना मोफत जेवण दिले.
एप्रिल महिन्यापासून महामार्गालगत असलेल्या परमिट रुम व बिअर बार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करीत दारू दुकानांच्या परवान्याचे नूतणीकरण थांबविले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील मोक्याच्या ठिकाणी असलेला पारोळा येथील माजी नगरसेवक जितेंद्र पवार यांचे दारूचे दुकान देखील बंद होते. या निर्णयानंतर पवार यांनी बियरबार पुन्हा सुरु व्हावा यासाठी पाठपुरावा सुरु ठेवलेला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील दुकानांना परवाना देण्यास परवानगी मिळाली होती. या निर्णयामुळे बारमालक जितेंद्र पवार यांच्यासह मित्र परिवारात आनंद पसरला. पवार यांनी देखील या आनंदाचे सेलिब्रेशन म्हणून नियमित ग्राहक व मित्रपरिवार अशा 300 जणांना मोफत शाकाहारी व मासांहारी जेवण देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी पितृपक्षात मंगळवार 12 सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करीत रितसर निमंत्रण देखील पाठविले.
मंगळवारी सकाळपासून 300 पेक्षा जास्त ग्राहक व मित्रांनी शाकाहारी व मासांहारी जेवणाचा आनंद घेतला.जेवणासाठी आलेल्या ग्राहकांची बारमालक तसेच वेटर आस्थेवाईक चौकशी करून आग्रहाने वाढत होते.पवार यांचे दारू दुकान ऐन पितृपक्षात सुरु झाल्यानंतर त्यांनी मोफत जेवणावळ देत ग्राहक व मित्र परिवाराचा आत्मा गार केल्याची चर्चा मंगळवारी संपूर्ण पारोळ्यात होती.