एसटी महामंडळातर्फे तिकीट तपासणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:55+5:302021-09-23T04:18:55+5:30
अनलॉकनंतर एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेने सर्व मार्गांवर बससेवा सुरू केली आहे. प्रवाशांचादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, एसटी महामंडळ ...

एसटी महामंडळातर्फे तिकीट तपासणी मोहीम
अनलॉकनंतर एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेने सर्व मार्गांवर बससेवा सुरू केली आहे. प्रवाशांचादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, एसटी महामंडळ प्रशासनाने गैर प्रकारांना आळा बसण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत प्रवाशांची तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत महामंडळाच्या जळगाव विभागातून बाहेरगावी जाणाऱ्या-येणाऱ्या बसेसला रस्त्यात कुठेही थांबवून प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात येणार आहे. तिकीट तपासणीसाठी १४ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, या पथकात महामंडळाच्या विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. शहरासह व ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसमधील प्रवाशांचीही तिकीट तपासणी करण्यात येणार आहे. बुधवारपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, सायंकाळपर्यंत पथकाला कुठल्याही बसमध्ये विनातिकीट प्रवासी आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
तर प्रवाशाकडून तिकीट दराच्या दुप्पट दंडात्मक कारवाई
महामंडळाच्या तिकीट तपासणी मोहिमेत जो प्रवासी बसमधून विनातिकीट प्रवास करताना आढळून येईल, त्या प्रवाशावर प्रवासी भाड्याच्या दुप्पट रक्कम दंड स्वरूपात आकारण्यात येणार आहे. किंवा १०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी बसमधून विनातिकीट प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
इन्फो :
वाहकांवरही कारवाई होणार
संबंधित बसमध्ये विनातिकीट प्रवासी आढळल्यास, त्या प्रवाशावर दंडात्मक कारवाई होणार आहे. मात्र,या सोबतच बसमधील वाहकावरही कारवाई होणार आहे. यात दोषी आढळल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई किंवा इतर आगारात बदलीची कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेे.