राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:46+5:302021-09-25T04:15:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुंबई वगळता राज्यातील इतर नगरपालिका व महानगरपालिकांमधील आगामी निवडणुकांमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्याचा निर्णय ...

Three in the state, three in the ward | राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुंबई वगळता राज्यातील इतर नगरपालिका व महानगरपालिकांमधील आगामी निवडणुकांमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे इच्छुकांची झोप उडाली असून, या निर्णयामुळे मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणेच निवडणुका लढल्या गेल्यास राज्यातील तिघाडी सरकारला वॉर्डात उमेदवारी देताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे भाजप बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी सुरुवातीपासून आग्रही असल्याने राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत भाजपकडून करण्यात आले आहे.

जळगाव महापालिकेसाठी २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरातील एकूण प्रभाग १९ करण्यात झाले होते. त्यात प्रत्येक प्रभागात चार सदस्य निवडून आले होते. दरम्यान, पुढील निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून आता ३ सदस्य निवडणूक लढवू शकणार आहेत. २०१८ मध्ये निवडणूक झाल्यानंतर आगामी २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग रचना राहील अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागाचा विचार करून, तेवढ्या भागातच विकासकामे करण्यावर भर दिला होता. मात्र, आता पुन्हा बहुसदस्यीय प्रभागरचना कायम राहणार असल्याने नगरसेवकांना आपल्या उर्वरित कार्यकाळात संपूर्ण प्रभागाच्या विकासावर भर द्यावा लागणार आहे.

मनपाची सध्याची स्थिती

२०१३ मध्ये शहरात एकूण ३८ वॉर्ड होते तर एका प्रभागात २ सदस्यीय पद्धत होती. विद्यमान महापालिकेत एकूण १९ प्रभाग असून, सदस्य ७५ आहेत. एका प्रभागातून चार सदस्य येतात.

शहरात १९ ऐवजी होणार २५ प्रभाग

शहरात चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एका प्रभागात चार सदस्यांनुसार एकूण ७५ नगरसेवकांसाठी एकूण १९ प्रभाग तयार करण्यात आले होते. मात्र, आता एका प्रभागात ३ सदस्य राहणार असल्याने प्रभागांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत एकूण २५ प्रभाग होण्याची शक्यता आहे.

युती-आघाडी करताना येणार टेन्शन

बहुसदस्यीय प्रभागपद्धत असल्याने राजकीय पक्षांनी युती आघाडी केली तर थेट एक प्रभाग एका पक्षासाठी सोडावा लागणार आहे. एका प्रभागात युतीतील पक्षातील वेगवेगळे उमेदवार दिल्यास राजकीय पक्षांचे गणितदेखील बिघडण्याची शक्यता आहे. कारण एका प्रभागात नागरिकांना तीन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे.

कितीही प्रभाग पद्धत करा, मात्र विकास करा

शहरातील रस्त्याची स्थिती फारच दयनीय झाली आहे. एका प्रभागात एक सोडून चार-चार नगरसेवक आहेत. मात्र, जनतेचे प्रश्न सोडायला कोणीही तयार नाही. अमृत योजनेवर खापर फोडून सर्वच नगरसेवक रस्त्यांचा समस्यांपासून पळ काढत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये एक प्रभाग पद्धत असो वा चार प्रभाग पद्धत असो, नागरिक मतदान तर करतीलच, मात्र शहराच्या विकासाबाबत काय, यावर कोणी बोलणार का, असा प्रश्न सर्वसामान्य जळगावकरांकडून उपस्थित केला जात आहे.

कोट...

हा निर्णय प्रशासकीय योजनेनुसार घेतला गेला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. निवडणुकांमध्ये जनतेसमोर जावे लागतेच.

- विष्णू भंगाळे, जिल्हा प्रमुख, शिवसेना

राज्यभरातील परिस्थिती बघून हा चांगला निर्णय घेतला आहे. त्यात जनतेचे हित महत्त्वाचे आहे. जनतेचा फायदा बघूनच हा निर्णय घेतला गेला असेल. निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या यावर विचार करू.

- ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

हा निर्णय अतिशय चांगला आहे. त्यात दोन जणांना मिळून प्रभागात चांगले काम करता येईल. यामुळे जनतेचा फायदाच होणार आहे. उमेदवारांपेक्षा शासनाने जनतेचा विचार केला आहे.

- ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

भाजपच्याच काळात बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता. या शासनानेदेखील तोच निर्णय कायम ठेवल्याने या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे तीन नगरसेवक मिळून प्रभागातील विकासकामे करू शकतात.

- दीपक सूर्यवंशी, जिल्हा, महानगराध्यक्ष, भाजप

Web Title: Three in the state, three in the ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.