भादली रेल्वे गेट भुयारी मार्गासाठी तीन दिवस गांधीगिरी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST2021-07-10T04:12:56+5:302021-07-10T04:12:56+5:30
नशिराबाद : भादली रेल्वे गेट भुयारी मार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत असून अनेक ...

भादली रेल्वे गेट भुयारी मार्गासाठी तीन दिवस गांधीगिरी आंदोलन
नशिराबाद : भादली रेल्वे गेट भुयारी मार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भादली रेल्वेगेट येथे भुयारी मार्गाचे काम तत्काळ व्हावे, याबाबत अनेकदा निवेदन देऊनही उपयोग होत नसल्याने अखेर रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ ते ३० जुलै दरम्यान तीन दिवसीय गांधीगिरी आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सरपंच पंकज महाजन यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे. भुसावळ मध्य रेल्वे मंडळाचे महाप्रबंधकांना शुक्रवारी याबाबत निवेदन देण्यात आले.
रेल्वे गेट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना फेऱ्याने जावे लागत आहे. भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ येथे भुयारी मार्ग तत्काळ पूर्णत्वास येण्यासाठी संबंधित अधिकारी ठेकेदारांना सूचना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. संभाव्य पावसाची स्थिती लक्षात घेता रेल्वे गेट भुयारी मार्ग सुरू करण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
वेगवेगळे आंदोलन
२७ जुलैपर्यंत भुयारी मार्गाचे काम सुरू न झाल्यास भादली रेल्वे स्टेशन समोर तीन दिवस गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात २८ जुलै रोजी बैलांना आंघोळ घालून ‘खुराक आंदोलन’, २९ रोजी घरून न्याहारी घेऊन रेल्वे स्टेशनवर न्याहारी करणे आंदोलन, ३० रोजी भादली रेल्वे स्टेशनवर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन, प्रकाश नारखेडे, सुभाष चौधरी, किरण माळी आदींच्या स्वाक्षरी आहे.
दरम्यान, ११ जून २०१९ रोजी भादली रेल्वे स्टेशनवर रेल्वे सेफ्टीचे कमिशनर जैन तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी भादली रेल्वे स्टेशन येथे आले होते, त्यावेळी शेतकऱ्यांनी भुयारी मार्ग काम सुरू करण्याबाबत विनंती केली होती. त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांना लवकरच काम सुरू होईल, आता वरिष्ठ आले म्हणजे कामाला सुरुवात होणारच असे आश्वासन देण्यात आले होते. त्यास महिना उलटला तरीसुद्धा काम जैसे थे स्थितीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.