अमळनेरात पुन्हा तीन कोरोना ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 22:32 IST2020-04-26T22:32:03+5:302020-04-26T22:32:09+5:30
अत्यावश्यक वस्तू घरपोच : मयत संशयितांच्या नातेवाईकांना केले क्वारंटाईन, एकूण रुग्ण संख्या १३

अमळनेरात पुन्हा तीन कोरोना ‘पॉझिटिव्ह’
अमळनेर : जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतल्यापैकी येथील तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून ते पॉझिटीव्ह आले आहे. त्यात अमळनेर अमलेश्वर नगर येथील एका १७ वर्षीय तरुणाचा व ४४ वर्षीय प्रौढाचा तसेच शाह आलमनगरातील ६७ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.
शनिवार पर्यंत अमळनेर शहरात ९ तर मुंगसे येथे एक असे एकूण १० कोरोना रुग्ण आढळले होते. रविवारी येथील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १३ इतकी झाली आहे. दरम्यान तिघा मयत संशयित रुग्णांचा अहवाल आला नसला तरी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. अक्षयतृतीयाच्या दिवशी देखील हॉटस्पॉट झोन मध्ये सर्व्हे करण्यात आला. दरम्यान या झोनमध्ये पूर्णत: संचारबंदी करण्यात आली आहे. शहरातील तांबेपुरा , सानेनगर व अमलेश्वर नगर भागातील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यांना प्रथमदर्शनी कोरोना सदृष्य लक्षणे दिसत असल्याने जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी रवाना केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रताप हॉस्टेल आणि आंबेडकर वसतिगृहात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्रांताधिकारी सीमा आहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी विलास महाजन, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे सतर्क असून उपाययोजना करीत आहेत.