त्या १८ कर्मचाऱ्यांची अखेर बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST2021-09-17T04:21:06+5:302021-09-17T04:21:06+5:30
जळगाव : जिल्हा परिषदेच्या सेवेत एकाच विभागात पाच वर्षे सेवा झाल्यानंतरही १२ वरिष्ठ व ६ कनिष्ठ सहाय्यकांची बदली झालेली ...

त्या १८ कर्मचाऱ्यांची अखेर बदली
जळगाव : जिल्हा परिषदेच्या सेवेत एकाच विभागात पाच वर्षे सेवा झाल्यानंतरही १२ वरिष्ठ व ६ कनिष्ठ सहाय्यकांची बदली झालेली नव्हती. अखेर सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी याबाबत आदेश देत या कर्मचाऱ्यांची अन्य विभागात बदली केली आहे. बुधवारी तातडीने ही प्रक्रिया राबविण्यात आली.
मंगळवारी परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने या कर्मचाऱ्यांची फाईल सीईओंनी हाती घेतली. शासकीय नियमानुसार एका विभागात ५ वर्षे व एका टेबलवर ३ वर्षे सेवा दिल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांची बदली होते. मात्र, या १८ अधिकारी, कर्मचाऱ्यांची अशी बदली झालेली नव्हती. शिवाय काही सदस्यांकडून याबाबत तक्रारीही झालेल्या होत्या. यात बांधकाम व शिक्षण विभाग प्रत्येकी ४, ग्रामपंचायत ३, कृषी, ग्रामीण पाणीपुरवठा व महिला व बालकल्याण १ अशा बदल्या करण्यात आल्या असून ३० सप्टेंबर रोजी त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे.
रखडलेल्या पदोन्नत्या दिल्या
१८ परिचर कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून या पदोन्नत्या रखडल्या होत्या. या पदोन्नतीची प्रक्रिया मंगळवारी राबविण्यात आली. दरम्यान, आरोग्य विभागात आता पुरेसे मनुष्यबळ असल्याने त्या ठिकाणच्या रखडलेल्या पदोन्नत्याही लवकरच होणार असल्याचे सांगितले जात आहे.