तिसऱ्या रेल्वे मार्गावरून १५ ऑगस्टपासून धावणार रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:17 IST2021-07-29T04:17:07+5:302021-07-29T04:17:07+5:30
जळगाव : गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या ३४ तासांच्या मेगा ब्लॉकमध्ये तिसऱ्या रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेचे १०० टक्के काम पूर्ण ...

तिसऱ्या रेल्वे मार्गावरून १५ ऑगस्टपासून धावणार रेल्वे
जळगाव : गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या ३४ तासांच्या मेगा ब्लॉकमध्ये तिसऱ्या रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी पूर्णतः तयार झाला असून, येत्या १५ ऑगस्टपासून किंवा शक्य झाल्यास त्यापूर्वी या मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरू करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच हा मार्ग सुरू झाल्यावर सुरतकडून येणाऱ्या सर्व गाड्या मध्य रेल्वेच्या मुख्य लाइनवरून न जाता नवीन तिसऱ्या मार्गावरूनच भुसावळला रवाना होणार आहेत.
भुसावळ रेल्वे प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी भुसावळ ते भादलीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर आता भादली ते जळगावदरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचेही काम पूर्ण केले आहे. एकूण २४ किलोमीटरचा हा मार्ग असून, या तिसऱ्या अतिरिक्त रेल्वे मार्गामुळे भुसावळ ते जळगावदरम्यान वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. या नवीन तिसऱ्या मार्गावर मार्चमध्ये रेल्वे प्रशासनाने १२० किलोमीटर वेगाने इंजिन चालवून, रुळांची चाचणी घेतली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात तब्बल ३४ तासांचा मेगा ब्लॉक घेऊन सिग्नल यंत्रणेचे तांत्रिक कामही पूर्ण केले आहे. त्यामुळे जळगाव ते भुसावळ हा तिसरा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.
इन्फो :
सध्या सिग्नल यंत्रणेची चाचणी अंतिम टप्प्यात :
गेल्या आठवड्यात सिग्नल यंत्रणेचे काम १०० टक्के पूर्ण झाले असले तरी, सिग्नल यंत्रणेच्या चाचणीचे काम अपूर्ण होते. त्यामुळे या मार्गावर सध्या रेल्वेच्या दूरसंचार विभागातर्फे सिग्नल यंत्रणेच्या चाचणीचे काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून, या मार्गावरील सर्व सिग्नल यंत्रणा अत्याधुनिक स्वरूपाची आहे. त्यामुळे लोको पायलटला पाच किलोमीटर अंतरावरूनही कुठले सिग्नल चालू आहे आणि कुठले बंद आहेत. हे समजणार आहे.
इन्फो :
..तर भुसावळहून सर्व गाड्या मुख्य लाइनवरून जळगावला येणार :
सुरतहून जळगावला येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्स्प्रेस व मालगाड्या या तिसऱ्या रेल्वे मार्गावरूनच भुसावळला रवाना करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे, तर भुसावळहून जळगावकडे येणाऱ्या सुरत व मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या या तिसऱ्या रेल्वे मार्गावरून न येता, मुख्य लाइनवरूनच जळगावला येणार आहेत. सध्या तयार झालेला तिसऱ्या रेल्वे मार्गाचा वापर फक्त सुरतकडून येणाऱ्या गाड्यांसाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गावरून टप्प्याटप्प्याने इतर गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
इन्फो :
जळगाव ते भुसावळदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून, सध्या सिग्नल यंत्रणेच्या चाचणीचे काम सुरू आहे. तेही काम लवकरच पूर्ण होणार असून, शक्य झाल्यास १५ ऑगस्ट किंवा त्यापूर्वी हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी खुला होईल. तसेच सुरुवातीला या मार्गावरून सुरतहून भुसावळला जाणाऱ्या गाड्या रवाना करण्यात येणार आहेत.
विवेककुमार गुप्ता, डीआरएम, रेल्वे विभाग, भुसावळ