मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाला तिसरा रेल्वे मार्ग जोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST2021-08-18T04:22:40+5:302021-08-18T04:22:40+5:30
जळगाव : शिव कॉलनी उड्डानपुलाच्या खाली तिसऱ्या रेल्वे मार्गाचे रूळ टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने मंगळवारी घेतलेल्या मेगाब्लॉकमध्ये ...

मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाला तिसरा रेल्वे मार्ग जोडला
जळगाव : शिव कॉलनी उड्डानपुलाच्या खाली तिसऱ्या रेल्वे मार्गाचे रूळ टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने मंगळवारी घेतलेल्या मेगाब्लॉकमध्ये पुलाच्या अलीकडे सिग्नल रूळ टाकून, तिसरा रेल्वे मार्ग मुंबईकडे जाणाऱ्या (अपच्या) मुख्य रेल्वे मार्गाला जोडला. मात्र, जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या या तिसऱ्या रेल्वे मार्गावर विद्युत यंत्रणा व सिंगल यंत्रणेचे काम अपूर्ण असल्यामुळे, प्रत्यक्षात या मार्गावरून रेल्वे धावण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, शुक्रवारी या मेगाब्लॉकळे अप आणि डाऊन मार्गावरच्या अनेक गाड्या विलंबाने धावल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
रेल्वे प्रशासनाने १२ आणि १७ ऑगस्ट रोजी प्रत्येकी पाच तासांचा मेगाब्लॉक घेऊन मुख्य रेल्वे मार्गाला तिसऱ्या रेल्वे मार्गाचे रूळ जोडण्याचे काम पूर्ण केले. या कामाकरिता मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळात मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकमुळे जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस, तुलसी एक्सप्रेस, गितांजली एक्सप्रेस, पुष्पक एक्सप्रेस व कामायानी एक्सप्रेस या गाड्या भुसावळ स्टेशन व सावदा स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या.
तर मुंबईकडून जळगावकडे येणाऱ्या गोरखपुर सुपरफास्ट एक्सप्रेस, तुलसी एक्सप्रेस, गितांजली एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस व काशी एक्सप्रेस या गाड्या पाचोरा व शिरसोली स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या. एक ते दोन तासांपर्यंत या गाड्या विलंबाने धावल्या.
इन्फो :
५० टक्के काम अजूनही अपूर्ण
जळगाव ते शिरसोली या तिसऱ्या रेल्वे मार्गावर सध्या रूळ टाकण्याचेच काम पूर्ण झाले आहे. तर आता हा मार्ग मुख्य रेल्वे मार्गालाही जोडण्यात आला आहे. मात्र, विद्युतीकरण करणे व सिंग्नल यंत्रणा उभारण्याचे काम अपूर्ण आहे. ही कामे करायला रेल्वेला सहा महिने लागणार आहे. त्यानंतर मार्गाची चाचणी होऊन, सहा महिन्यानंतरच या मार्गावरून जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वे धावणार आहे.
इन्फो :
दोन दिवसांच्या या मेगाब्लॉक मध्ये तिसरा रेल्वे मार्ग अपच्या मुख्य मार्गाला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच आता विद्युतीकरण व सिंग्नल यंत्रणेचे काम सुरू करण्यात येणार आहे.
पकंज डावरे, उप मुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग