जळगाव जिल्ह्यात बंद दरम्यान प्रशासनाचा नियंत्रण कक्ष ठरला तिसरा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:26 IST2018-01-04T13:24:05+5:302018-01-04T13:26:32+5:30
मोर्चाला कोठेही गालबोट नाही

जळगाव जिल्ह्यात बंद दरम्यान प्रशासनाचा नियंत्रण कक्ष ठरला तिसरा डोळा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 04- कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या जळगाव जिल्हा बंद दरम्यान जिल्हाभरात 11 मोर्चे काढण्यात आले. यासाठी 26 अधिकारी व 190 कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. सर्वत्र मोर्चे शांततेत पार पडले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरातील स्थितीचा आपत्कालीन कक्षातून आढावा घेतला जात होता. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार मुख्यालयी थांबून होते.
जिल्हा बंद दरम्यान नशिराबाद, वरणगाव, धरणगाव, बोदवड, भडगाव, अमळनेर, भुसावळ, जळगावात शनिपेठ पोलीस स्टेशनवर तसेच चाळीसगाव येथे वेगवेगळे तीन मोर्चे असे एकूण 11 मोर्चे काढण्यात आल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे.
दिवसभर माहिती घेणे सुरू
जिल्ह्यातील बंदच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षातून माहिती घेतली जात होती. यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्याकडून सर्व स्थितीचा आढावा घेतला जात होता.
मुख्यालयी थांबण्याचे आदेश
जिल्ह्यातील बंदच्या पाश्र्वभूमीवर प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यानुसार ते आपापल्या मुख्यालयी थांबून होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.