नंदुरबारचे ‘सिव्हिल’ राज्यात तृतीय
By Admin | Updated: May 13, 2014 00:02 IST2014-05-13T00:02:17+5:302014-05-13T00:02:17+5:30
रवींद्र मोराणकर, नंदुरबार- चांगल्या रुग्णसेवेबद्दल नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने राज्य स्तरावर तृतीय स्थान मिळविले आहे.नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला ८० पैकी ६४ गुण मिळाले आहेत.

नंदुरबारचे ‘सिव्हिल’ राज्यात तृतीय
रवींद्र मोराणकर, नंदुरबार- चांगल्या रुग्णसेवेबद्दल नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने राज्य स्तरावर तृतीय स्थान मिळविले आहे. बाह्यरुग्ण व आंतर रुग्णांना दिल्या जाणार्या विविध सेवांबाबतचे मूल्यांकन मुंबईस्थित आरोग्य सेवा संचालनालयातर्फे करण्यात आले. त्यात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला ८० पैकी ६४ गुण मिळाले आहेत. राज्य शासनाच्या अखत्यारित रुग्णांना दिल्या जाणार्या आरोग्य सेवांचे दरवर्षी मूल्यांकन करण्यात येते. ज्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये जोडलेली नाहीत अशी राज्यात २७ जिल्हा सामान्य रुग्णालये आहेत. या रुग्णालयांचे आरोग्य सेवा संचालकांतर्फे मूल्यांकन करण्यात आले. या तपासणीत बेडचा वापर, दररोज तपासण्यात येणारे सरासरी बाह्यरुग्ण, डायलिसीस, शवविच्छेदन, दंतरोग तपासणी, अपघातग्रस्त रुग्णांना मिळालेली सेवा, बाळंतपण, शस्त्रक्रिया इत्यादींचा वर्षभराचा आढावा घेण्यात आला. या मूल्यांकनाच्या आधारे भंडारा जिल्हा रुग्णालयाने (६९ गुण) प्रथम, तर अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने (६५ गुण) द्वितीय स्थान पटकावले. सातारा, गडचिरोली व नंदुरबार या तीन जिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी ६४ गुण मिळाले आहेत. यामुळे ही तिन्ही रुग्णालये संयुक्तरीत्या तिसर्या स्थानावर राहिली. जळगाव जिल्हा रुग्णालयाला ५५ गुण मिळाले असून, ते सतराव्या स्थानावर राहिले आहे. धुळे जिल्हा रुग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जोडल्याने त्यांचा विचार या मूल्यांकनात करण्यात आलेला नाही. जिल्हा रुग्णालयातील सर्व सहकारी डॉक्टर्स, परिचारिका यांच्यासह सर्व कर्मचार्यांच्या योगदानामुळे नंदुरबार जिल्हा रुग्णालय राज्यात तिसर्या स्थानावर राहिले. गेल्या वर्षी आम्ही दहाव्या स्थानावर होतो. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत रुग्ण सेवेच्या बाबतीत नक्कीच प्रगती होत आहे. -डॉ.हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार पहिली १० रुग्णालये जिल्हा गुण भंडारा ६९ अहमदनगर ६५ सातारा ६४ गडचिरोली ६४ नंदुरबार ६४ खामगाव ६२ वर्धा ६२ जालना ६१ पुणे ६० परभणी ५९