पोलीस पोहोचण्याआधीच चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST2021-08-22T04:18:58+5:302021-08-22T04:18:58+5:30

जळगाव : रामानंदनगर परिसरात संकल्प श्रीनगर कॉलनीत विद्या काशिनाथ पाटील यांच्या बंद घरातून चोरट्यांनी ७० हजार ३०० रुपयांचा ऐवज ...

The thieves passed before the police arrived | पोलीस पोहोचण्याआधीच चोरटे पसार

पोलीस पोहोचण्याआधीच चोरटे पसार

जळगाव : रामानंदनगर परिसरात संकल्प श्रीनगर कॉलनीत विद्या काशिनाथ पाटील यांच्या बंद घरातून चोरट्यांनी ७० हजार ३०० रुपयांचा ऐवज लांबविल्याचे निष्पन्न झाले आहे. १८ ऑगस्ट रोजी रात्री पाटील यांच्याकडे घरफोडी झाली होती. घरात चोरटे शिरल्याची माहिती मिळताच विद्या पाटील यांनी पोलिसांना घेऊन घर गाठले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला.

विद्या पाटील या मुलगा तेजस याच्यासोबत वास्तव्यास आहेत. त्या जिल्हा परिषदेत नोकरीला आहेत. १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता मुलगा तेजस याची तब्येत खराब झाल्याने विद्या पाटील त्यास हॉस्पिटल येथे घेऊन गेल्या होत्या. डॉक्टरांनी त्यास दाखल करून घेतले. त्यामुळे विद्या पाटील या दवाखान्यातच थांबल्या. १९ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास विद्या पाटील यांना शेजारी राहणा-या चैताली राठोड यांनी फोन करून घरात चोर घुसले व मोठ्याने आवाज येत असून तुम्ही घरी लवकर या, असे सांगितले. विद्या या लागलीच त्यांचे काका शशिकांत कोकाटे यांच्यासोबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गेल्या. तेथून कर्मचा-यांना सोबत घेऊन घरी पोहोचल्या. मात्र, तोपर्यंत चोर पळून गेले होते. घरात पाहणी केली असता, चोरट्यांनी घरातून सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याचे कानातले तीन जोड, सोन्याची चेन, चांदीचे तीन कॉइन या दागिन्यांसह १० हजार रुपयांची रोकड असा ७० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लांबवून नेल्याचे समोर आले. २० ऑगस्ट रोजी विद्या पाटील यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तपास राजेश शिंदे करीत आहेत.

Web Title: The thieves passed before the police arrived