चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी मेडिकल फोडले, हॉस्पिटलमध्ये प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST2021-06-21T04:12:50+5:302021-06-21T04:12:50+5:30
जळगाव : रविवारी पहाटेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमधून आलेल्या चोरट्यांनी महामार्गाला लागून असलेल्या मेडिकल व हॉस्पिटलमध्ये शटर तोडून ...

चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी मेडिकल फोडले, हॉस्पिटलमध्ये प्रयत्न फसला
जळगाव : रविवारी पहाटेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमधून आलेल्या चोरट्यांनी महामार्गाला लागून असलेल्या मेडिकल व हॉस्पिटलमध्ये शटर तोडून धुमाकूळ घातला. ॲपेक्स हॉस्पिटलच्या मेडिकलच्या शटरचे लॉक तोडून त्यातील ७ हजार २०० रुपये रोख व एक हजार रुपये किमतीचे घड्याळ लांबविले तर याच मार्गावर पुढे असलेल्या विनोद हॉस्पिटल व विवेकानंद नेत्रालयातही चोरीचा प्रयत्न झाला. तेथे कर्मचाऱ्यांना जाग आल्याने चोरट्यांनी पलायन केले. दरम्यान, एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत चोरटे कारसह कैद झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशवाणी चौकानजीकच्या ॲपेक्स हॉस्पिटलच्या आवारात पारसमल मुलतानमल जैन यांच्या मालकीचे मेडिकल आहे. तेथे चेतन प्रकाश नेवे (वय ३५,रा.गुरुदत्त कॉलनी) हा तरुण कामाला असून शनिवारी रात्रपाळीच्या ड्युटीला होता. रविवारी पहाटे साडेचार वाजता शटर बंद व कुलूप लावून तो नैसर्गिक विधीसाठी हॉस्पिटलमध्ये गेला. तेथून ४.५० वाजता परत आला असता त्याला मेडिकलचे शटर तुटलेले दिसले तर ड्रावरमधील रोकड व घड्याळ गायब झाले होते. या प्रकाराबाबत नेवे याने मेडिकल मालक पारसमल मुलतानमल जैन यांना माहिती दिली. माहिती मिळाल्यावर जैन हे मेडिकलवर आले. पोलिसांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. मेडिकलचे शटर टॉमीने वाकविलेले तर मेडिकलचे ड्राॅवर तुटलेले दिसून आले.
कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला
ॲपेक्स हॉस्पिटलमधून चोरी यशस्वी झाल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा येथून जवळच असलेल्या विनोद हॉस्पिटलच्या मेडिकलकडे वळविला. येथे चारचाकीतून आलेल्या चोरट्याने उतरुन भिंतीवरून उडी मारली. तेव्हा कर्मचारी सुरेश राऊत यांना जाग आली. त्यांना संशय आल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता चोरट्यांनी त्यांना पाहताच पलायन केले. त्यानंतर विवेकानंद नेत्रालय येथील मेडिकलचे कुलूप तोडले. तेथे काहीच मिळाले नाही म्हणून पाण्याच्या बाटल्या लांबविल्या आहे. याप्रकरणी चेतन प्रकाश नेवे याच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत आहेत.
कार व चोरटे सीसीटीव्हीत कैद
विनोद हॉस्पिटलच्या मेडिकलजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी चारचाकी वाहनाने हे चोरटे आले. त्यांनी हॉस्पिटलसमोर चारचाकी उभी केली. तिघांपैकी तोंडाला रुमाल बांधलेला चोरटा आला. त्याने हॉस्पिटलच्या वाॅल कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी घेत आत प्रवेश केला. त्यानंतर दुसरा साथीदार कटर, टॉमी घेवून कंपाऊंडजवळ आला. इतक्यात कुणीतर येत असल्याचा सुगावा लागल्याने आत प्रवेश केलेला चोरटाही पुन्हा भिंतीवरून उडी घेत बाहेर पडला. यानंतर दोघेही चोरटे लोखंडी टॉमी आणि कटर घेऊन पळतांना दिसून येत आहे. तोंडाला रुमाल तसेच अंगात जर्किंग असे चोरट्यांचे वर्णन आहे.